पॉड टॅक्सीच्या कामाला मार्चचा मुहूर्त

पॉड टॅक्सीच्या कामाला मार्चचा मुहूर्त

Published on

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मिरा-भाईंदर शहरात येत्या दोन वर्षांत पॉड टॅक्सी सुरू होणार आहे. या टॅक्सीतून ३० रुपयांत प्रवास करणे शक्य होणार आहे. पॉड टॅक्सीच्या कामाला येत्या मार्चमध्ये सुरुवात होणार असून दोन वर्षांत म्हणजेच मार्च २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांमुळे कोंडीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सर्वसामान्यांचा जास्तीत जास्त प्रवास रिक्षेने होतो. त्यांना आता पॉड टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मिरा-भाईंदरमध्ये सार्वजनिक-खासगी सहभाग (पीपीपी) या तत्वावर न्यूट्रान ईव्ही मोबिलिटी ही कंपनी पॉड टॅक्सी सुरू करणार आहे. ३० वर्षांसाठी हा करार असणार आहे. कंपनीने शहरात सुमारे ३३ किमी मार्गाचे सर्वेक्षण केले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १४ किमीचा मार्ग पॉड टॅक्सीसाठी निश्चित करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण बुधवारी (ता. ६) महापालिकेत करण्यात आले. या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आयुक्त राधाबिनोद शर्मा उपस्थित होते.

काशी-मिरा भागातील जे. पी. इन्फ्रा या गृहासंकुलापासून या मार्गाची सुरुवात होणार आहे. प्रभाग क्रमांक १२, १३, १८ यातून हा मार्ग जाणार आहे. किमान १८ मीटर रुंद असलेल्या मार्गावरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. या मार्गावर सुमारे १६ स्थानके असणार आहेत. प्रत्येक मार्ग मिरा-भाईंदर शहरात येत असलेल्या मेट्रोच्या स्थानकाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकदेखील गाठणे शक्य होणार आहे.

प्रिकास्ट पद्धतीचा वापर
पॉड टॅक्सीसाठी कमीत कमी जागा लागणार असून शक्यतो त्याचे खांब रस्त्याच्या दुभाजकांमध्येच उभे केले जाणार आहेत. यासाठी लागणारे ट्रॅक व अन्य साहित्य प्रिकास्ट म्हणजे तयार पद्धतीचे असणार आहेत. त्यामुळे आगामी दोन वर्षांच्या काळात संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण करणे शक्य आहे. या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पीपीपी तत्वावर असल्याने मिरा-भाईंदर महापालिका अथवा राज्य सरकारचा एकही पैसा यासाठी खर्च होणार नाही.

प्रवासी क्षमता तपासणार
प्रत्येक पॉड टॅक्सीमध्ये १६ प्रवासी सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी शिरले तर टॅक्सी सुरूच होणार नाही, अशी त्यात व्यवस्था आहे. चार ते पाच किमी अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी ३० रुपये शुल्क लागू असणार आहे. या शुल्कात दरवर्षी महागाई दरानुसार वाढ केली जाणार आहे.

दोन मिनिटांनी फेरी
तिकीट घेण्यासाठी कंपनीकडून एक मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलान तिकीट घेता येणार आहे. पॉड टॅक्सीची सेवा दिवस-रात्र सुरू रहाणार असून दोन टॅक्सीमधील कालावधी अवघ्या दोन मिनिटांचा असणार आहे. या सेवेत प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली असून प्रत्येक पॉड टॅक्सीमध्ये धडक टाळण्यासाठी ॲन्टी कोलिजन सिस्टीम बसविण्यात आलेली आहे.

पर्यावरणपूरक सेवा
पॉड टॅक्सीच्या रुळांवर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे चार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. या विजेतून पॉड टॅक्सी सेवा चालवली जाईल व शिल्ल्क राहिलेली वीज ग्रीडद्वारे वीज कंपनीला दिली जाईल. त्यातून रात्रीच्या वेळी लागणाऱ्या विजेची गरज भागवली जाणार आहे. त्यामुळे ही सेवा पर्यावरणपूरक आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

पॉड टॅक्सी सेवेला परिवहन विभागाकडून याआधीच हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. कंपनीने या सेवेचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. महापालिका आता तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवणार आहे. प्रकल्पाचे काम मार्चपासून सुरू करण्याचे नक्की करण्यात आले असले तरी सर्व परवानग्या लवकरात लवकर घेऊन दिवाळीपर्यंत काम प्रारंभ करण्याचा प्रयत्न राहील.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

अंतर सुमारे ३३ किमी
स्थानके १६
खर्च १,००० कोटी
प्रवासी क्षमता १६
किमान शुल्क ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com