ख्रिस गेल प्रो गोविंदा लीगचे ब्रँड ऍम्बेसिडर
ख्रिस गेल प्रो गोविंदा लीगचे ब्रँड ॲम्बेसिडर
मिरा-भाईंदरमध्ये रंगणार स्पेनच्या गोविंदाचा थरार
भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत गुरुवारी (ता. ७) सुरू होत असलेल्या प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या चषकाचे अनावरण ख्रिस गेल व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मिरा भाईंदर येथे करण्यात आले. गोकुळाष्टमीच्या दिवशी स्पेनचे खेळाडू मिरा-भाईंदरमध्ये मानवी मनोरा रचणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
प्रो गोविंदाचे तिसरे पर्व ७ ते ९ ऑगस्ट रोजी वरळी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी या स्पर्धेत १६ व्यावसायिक संघ सहभागी झाले असून, तब्बल ३,२००हून अधिक गोविंदा आपले कौशल्य व सामर्थ्याचे प्रदर्शन करतील. यंदा एकूण दीड कोटींची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी तीन लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी क्रिकेटपटू ख्रिस गेल यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल यांना भारताविषयी प्रेम असून त्यांना इथली संस्कृती व सणांची चांगली माहिती आहे. गेल यांचे भारतासह जगभरात चाहते आहेत. त्यामुळे त्यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह स्पेनमधील बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे सदस्य ॲना मनरेसा बसोली, बाख लेल ॲटोनी, फेलिक्स डियाझ प्रिटी मसाना आणि मिकेल फेरेट मिरालेस उपस्थित होते.
माझ्यासाठी सन्मान!
प्रो गोविंदा लीगचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून जोडले जाणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी जगभरात विविध खेळ पाहिले; पण गोविंदांमधील ऊर्जा, समन्वय आणि सांस्कृतिक अभिमान अतुलनीय आहे. प्रो गोविंदा ही लीग केवळ परंपरेचा उत्सव नाही, तर हा एक अनोखा क्रीडा प्रकार आहे. यात शारीरिक ताकद, सांघिक कौशल्य आणि परंपरेचा अफलातून मिलाफ पाहायला मिळतो; जो जगाने यापूर्वी कधीही पाहायला नसेल. या प्रवासाचा एक भाग होताना मला खूप आनंद होत आहे, अशी भावना या वेळी ख्रिस गेल यांनी व्यक्त केली.
मानवी मनोऱ्याची गिनीज बुकात नोंद
भाईंदर पूर्व येथील नवघर नाक्यावर दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सर्वात मोठा मानवी मनोरा रचण्यात गिनीज बुकात नोंद झालेला स्पेनमधील १११ गोविंदा (कॅसलर्स) या वेळी मानवी मनोरा रचून आपले कौशल्य मिरा भाईंदरच्या नागरिकांना दाखवणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या वेळी जाहीर केले.