डाक विभाग भावा-बहिणीच्या नात्याला जोडणारा सेतू

डाक विभाग भावा-बहिणीच्या नात्याला जोडणारा सेतू

Published on

डाक विभाग बहीण-भावाच्या नात्याला जोडणारा सेतू

ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्याचा एक सुंदर आणि पवित्र उत्सव आहे. परंतु आजच्या वेगवान आयुष्यात अनेक भाऊ कामासाठी परदेशात किंवा परराज्यात गेलेले असतात. त्यामुळे त्यांना बहिणीकडून राखी बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे डाक विभागाने या भावनिक अंतराला कमी करण्याचा एक सुंदर प्रयत्न केला आहे. १५ हजारांहून अधिक बहिणींनी त्यांच्या भावांना राख्या पाठवून प्रेम आणि नाते टिकवले आहे. डाक विभाग बहीण-भावाच्या नात्याला जोडणारा नवीन सेतू ठरत आहे. ही सेवा फक्त राखी पाठवण्यापुरती नाही तर या नात्यातील प्रेम, काळजी आणि जोपासणुकीचा एक संदेशदेखील आहे.

ठाण्यातील डाक विभागाकडून राखी पाठवण्यासाठी विशेष आकर्षक लिफाफे तयार केले होते. त्यामार्फतसुद्धा बहिणींनी राख्या पाठवल्या आहेत. तसेच साध्या पाकिटामधूनही अनेकींनी राख्या पाठवल्या असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. डिजिटल शुभेच्छांच्या युगात रक्षाबंधनाच्या बहीण- भावाच्या सणामध्ये डाक विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्णतः वॉटरप्रूफ लिफाफ्याच्या माध्यमातून ठाण्यातील बहिणींनी सुरक्षितपणे राख्या भावापर्यंत पाठवल्या आहेत. साधा लिफाफा, पोस्टाने तयार केलेला लिफाफा, स्पीड पोस्ट आणि साध्या सेवेमार्फत बहिणींनी परराज्यात आणि परदेशामध्ये राख्या पाठवल्या आहेत. या राख्या तीन ते १२ दिवसांपर्यंत भावाला मिळणार आहेत.

अनेक जण कामाच्या निमित्ताने परराज्यात किंवा परदेशात गेलेले आहेत. अशा भावांना रक्षाबंधनाच्या सणाकरिता घरी येणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण त्यांच्या लाडक्या बहिणीच्या राखीपासून वंचित राहतात. ठाणे शहरातूनही मोठ्या प्रमाणात बहिणींचे भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. ते भाऊ राखीपासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाण्यातील १५ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींनी डाक सेवेचा आधार घेतला आहे. या बहीण-भावाच्या नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी डाक विभागातील कर्मचारी धावून आले आहेत. बहिणींची प्रेमाची राखी या कर्मचाऱ्यांनी रशिया, आखाती देश, कॅनडा, सिंगापूर, लंडन पाठवली आहे. यासोबतच इतर राज्यांमध्ये कामानिमित्त गेलेल्या भावांकडेदेखील बहिणींनी डाक विभागाकडे दिलेल्या राख्या कर्मचाऱ्यांनी सुपूर्त केल्या आहेत.

आपल्या देशात दिलेल्या पत्त्यावर पोस्टमन राख्या घेऊन जात आहे, तर काही देशांमध्ये भावांना बहिणीने पाठवलेली राखी घेण्यासाठी स्वतः पोस्टामध्ये जावे लागत आहे. त्यामुळे डाक विभागामार्फत पाठवलेल्या राख्या १५ दिवस आधीच डाक विभागाकडे आल्या होत्या, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. डाक विभाग नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तयार असतो. तसेच प्रत्येक वर्षी बहीण-भावाचे प्रेम एकमेकांपर्यंत राख्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडतो. यंदाहीही जबाबदारी पार पाडत आहे. बहिणीने विश्वासाने आमच्याकडे दिलेली राखी पत्त्यावर वेळेत पोहोचेल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. आतापर्यंत डाक विभागामार्फत सुमारे १५ हजार राख्या पाठवल्याचे वरिष्ठ डाक अधिकारी राजीव होईलगोल यांनी सांगितले. तर सुमारे ४०० आकर्षक लिफाफे बहिणींनी डाक विभागाकडून घेतल्याचे जनसंपर्क अधिकारी रघुनाथ बांबडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com