रेल्वेच्या कंत्राटावरून दोन गटांत हाणामारी
रेल्वेच्या कंत्राटावरून दोन गटांत हाणामारी
भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : रेल्वेचे कंत्राट घेण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार भाईंदर पश्चिम येथे मंगळवारी (ता. ५) सायंकाळी घडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
जयेश मांजलकर व रूपेश पाटील हे दोघेही रेल्वेच्या कामासाठी बांधकाम साहित्य पुरविण्याचे कंत्राट घेतात. दोघांपैकी मांजलकर याचे काम सध्या भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी जयेश व रूपेश यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण झाली. मात्र जयेश व त्याच्या सहकाऱ्यांनी रूपेश व त्याच्या भावांना डोक्यात लोखंडी सळई व अन्य हत्याराने मारहाण केली. त्यात रूपेश पाटील, नितेश पाटील व भूषण पाटील जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जयेश मांजलकर, अभिषेक मिश्रा, राहुल शर्मा तसेच चार अनोळखी व्यक्तींवर भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल शर्मा याला अटक करण्यात आली आहे. जयेश मांजलकर हा आपल्याला काळ्या यादीत टाकत असल्याचे खोटे सांगून बदनामी करीत असल्याचा आरोप रूपेश पाटील याने केला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला, अशी माहिती भाईंदर पोलिसांनी दिली.