ठाणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना तयार

ठाणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना तयार

Published on

ठाणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना तयार
चार पॅनेलचे ३२ तर तीन पॅनेलचा एक प्रभाग; १३१ नगरसेवक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना तयार केली आहे. हा आराखडा पालिकेने नगरविकास विभागाकडे मंगळवारी (ता. ५) सुपूर्द केला आहे. २०१७मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत जी प्रभागरचना होती त्यात किंचित बदल झालेले आहेत. त्यामुळे चार पॅनेलचे ३२ तर तीन पॅनेलचा एक असे ३३ प्रभाग तयार करण्यात आले असून, ठाणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या १३१ इतकीच राहणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, असे असले तरी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले होते. ही प्रभागरचना तयार करताना जनगणनेची प्राप्त माहिती, प्रत्यक्ष स्थळाची पाहणी, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे, प्रभागाच्या हद्दी जागेवर जाऊन तपासणे या प्रक्रिया करण्यात आल्या. पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१७मध्ये ज्या पद्धतीने प्रभागरचना होती, त्याच पद्धतीने नव्याने प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या निवडणुकीत २०११ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. पण वाढत्या नागरीकरणामुळे मतदारसंख्या वाढली आहे. त्यामुळे प्रभागरचनेत बदल होईल, असा कयास बांधला जात होता. मात्र पालिकेने चार सदस्यांंचे ३२ आणि तीन सदस्यांचा एक असे ३३ प्रभाग तयार केले आहेत.

प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख येथून तर शेवट दिव्यातील तीन पॅनेलपर्यंत करण्यात आली आहे. २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जशी प्रभागरचना होती तशीच आताही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर २०१७ प्रमाणेच १३१ नगरसेवकच पुन्हा सभागृहात बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

..
६ ऑक्टोबरला शिक्कामोर्तब
ठाणे पालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंळवारी प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा नगरविकास खात्याकडे दिला आहे. २१ ऑगस्ट रोजी या प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता येणे अपेक्षित आहे. त्यानंतर २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती, ९ ते १५ सप्टेंबर या मुदतीत पुन्हा नगरविकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर होणार आहे. त्यानंतर १६ ते १७ सप्टेंबरपर्यंत अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठविणार असून, ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोग त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com