रस्ते दुरुस्तीची संथगतीने

रस्ते दुरुस्तीची संथगतीने

Published on

रस्तेदुरुस्ती संथगतीने
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : यंदा पावसाला मे महिन्यात सुरुवात झाली. त्यामुळे रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याची कामे अर्धवट राहिली. परिणामी, ऐन पावसाळ्यात ही समस्या कायम राहिली अन् पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाणही वाढले. दोन महिने याबाबत काहीच हालचाल न करणाऱ्या पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींना आता गणेशोत्सव जवळ आल्यावर खड्ड्यांची जाणीव होऊ लागली आहे. पाच दिवसांपूर्वी पालिकेने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे; मात्र शहरातील खड्ड्यांची स्थिती जैसे थी अशीच आहे.

तीन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झालेले असले तरी अनेक रस्ते आजही डांबरी आहेत. या डांबरी रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक खड्ड्यांचा त्रास सहन करत आहेत. खड्ड्यांचे कल्याण-डोंबिवलीला लागलेले ग्रहण सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. पालिका प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याने शासनस्तरावरून कोट्यवधी रुपयांचा निधीदेखील आणण्यात आला. त्यानुसार एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि पालिका प्रशासनामार्फत रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. ही कामे अत्यंत संथगतीने सुरू असून सिमेंटचे रस्ते ही अनेक ठिकाणी खराब झालेले दिसून येत आहेत. डांबरी रस्त्यांची अवस्था तर कोणी विचारू नये, अशीच आहे.

यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात होऊनदेखील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. अमृत योजना, जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. ही कामे झाल्यानंतर त्या रस्त्यांची डागडुजी केली नाही. केवळ खोदलेल्या रस्त्यावर माती ढकलून रस्ते तसेच सोडून देण्यात आले. यामुळे रस्ते ओबडधोबड झाले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाहनचालक याचा त्रास सहन करत आहेत. काही जागरूक नागरिक, रिक्षाचालकांनी स्वतःच खड्ड्यात डेब्रिज टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम केले; मात्र पालिका प्रशासनाला शहरातील खड्डे दिसलेले नाहीत.

आता गणेशोत्सव, दहिहंडी उत्सव जवळ आल्याने या खड्ड्यांबाबत राजकीय पक्षांनी आंदोलन करीत प्रसिद्धी करून घेतली. यानंतर पालिका प्रशासन जागे झाले असून ऑगस्टच्या सुरुवातीला त्यांनी खड्ड्यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी केला. जून, जुलै महिन्यात हा क्रमांक प्रसिद्ध करणे गरजेचे होते; मात्र आता उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केवळ कार्यतत्पर आहोत, असे दाखविण्यासाठी पालिका प्रशासन दिखावा करीत असल्याची टीका होत आहे. तसेच पावसात खड्डे बुजविण्यासाठी कॉल्ड मिक्स तसेच मास्टिक अल्फास्टिंगचा वापर करावा, जेणेकरून खड्डे पुन्हा उखडणार नाहीत, अशा सूचना नागरिक करीत आहेत.

डोंबिवलीतील सुभाष रोडवरच खड्डे?
१) महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेत त्यांना खड्ड्यांविषयी विचारणा केली असता, खड्डे भरण्याचे काम सातत्याने सुरू आहे. डोंबिवलीत सुभाष रोडवर खड्डे आहेत; मात्र उर्वरित शहरात कुठेच खड्डे नाहीत, असे आश्चर्यकारक उत्तर त्यांनी दिले. त्यावर त्यांना टिळक चौक, टिळक रोड, स. वा. जोशी शाळेजवळील ठाकुर्ली उड्डाणपुलाचा रस्ता, आयरे गावातील रस्ता यांसह इतर रस्त्यांची नावे घेतली असता प्रश्नार्थक नजरेने त्यांनी पाहत यावर जास्त काही बोलण्यास नकार दिला.
२) पालिका आयुक्त किंवा एखाद्या राजकीय नेत्याचा शहरात दौरा असला, की त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावरील रस्त्यांची साफसफाई केली जाते. खड्डे बुजविले जातात, कामे दाखविली जातात; मात्र त्या नेत्यांची, आयुक्तांची पाठ फिरताच त्या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते.

खड्ड्यांसाठी टोल फ्री क्रमांक
खड्डे बुजविण्याचे काम पालिकेमार्फत सुरू आहे. ज्या भागात खड्डे आहेत. त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेला द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी १८०० २३३ ००४५ हा टोल फ्री क्रमांक जारी करत तो २४ तास सुरू ठेवला आहे. नागरिकांनी खड्ड्यांची माहिती देऊन खड्डेमुक्त व सुरक्षित शहर बनविण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पालिकेने हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. मग पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्याची माहिती नागरिकांना देणे, प्रसिद्धिपत्रक काढणे आवश्यक आहे मग त्याला एवढा विलंब का होतो, असा सवाल नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com