थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

दीपक फाउंडेशनतर्फे चिल्हे शाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर
रोहा (प्रतिनिधी) ः दीपक नायट्रेट कंपनी, धाटाव व दीपक फाउंडेशन रोहा यांच्या वतीने ''फिरता दवाखाना'' उपक्रमांतर्गत चिल्हे येथील श्रमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आयोजित या शिबिरात त्यांचे उंची, वजन व आरोग्याची प्राथमिक तपासणीही करण्यात आली. यावेळी डॉ. ऐश्वर्या पाटील, काउन्सलर उत्कर्षा सरलेकर, डेटा एंट्री ऑपरेटर अंकिता ठाकूर, आणि मारुती निगडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले. विशेषतः पोषण, आरोग्यसंपन्न जीवनशैली आणि हिमोग्लोबिनच्या महत्त्वाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. मुख्याध्यापक दीपक जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक करत फाउंडेशनच्या कार्याबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक फाउंडेशनचा ''फिरता दवाखाना'' उपक्रम ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
...........
महसूल सप्ताहात सापोली येथील अतिक्रमणावर कारवाई
पेण (वार्ताहर) ः महसूल सप्ताहाच्या निमित्ताने पेण तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून सापोली (इनाम) येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले.
येथील शासकीय जमिनीवर सुधाकर शंकर पाटील यांनी अनधिकृत इमारत उभारली होती. यासंदर्भात प्रशासनाने पूर्वीच नोटीस दिली होती. मात्र दुर्लक्ष झाल्याने बुधवार, ६ ऑगस्ट रोजी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले गेले. या कारवाईदरम्यान तहसीलदार तानाजी शेजाळ, उप अधीक्षक भूमी अभिलेख, मंडळ अधिकारी, स्थानिक पोलीस पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
१ ते ७ ऑगस्टदरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहात महसुली अभिलेखाचे पुनरावलोकन, दाखल्यांचे वितरण, निवडणूक व्यवस्थापन, आणि सामाजिक योजनांचे अवलोकन यांसह विविध उपक्रम राबवले जात आहेत. ही कारवाई महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रत्यय देणारी ठरली असून, अशा अतिक्रमणप्रवृत्तींना रोखण्यासाठी भविष्यात आणखी कठोर पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
................
सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभेत गुणवंतांचा गौरव
पेण (वार्ताहर) ः पेण एज्युकेशन सोसायटीच्या सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सध्याच्या आर्थिक वर्षात संस्थेला २३ लाखांचा नफा मिळाला असून, सभासदांना ६ टक्‍के कायम निधीवर व्याज व ९ टक्‍के लाभांश जाहीर करण्यात आला. दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. देविदास बामणे यांना उपन्यास सम्राट प्रेमचंद पुरस्कार, तर राजेंद्र जाधव यांची इतिहास अभ्यासक समितीवर निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष धनाजी घरत, उपाध्यक्ष गौरव चहाटे, सचिव सुनील खेडकर, संचालिका अर्चना नेमाडे यांच्यासह अनेक मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. पतसंस्था केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्याही आदर्श निर्माण करत असल्याचे यावेळी दिसून आले.
.............
गायमुख शाळेत डॉ. विनया कांबळे यांचे आरोग्य व करिअर मार्गदर्शन
तळा (बातमीदार) ः गायमुख शाळेत नुकत्याच पार पडलेल्या विशेष मार्गदर्शन सत्रात डॉ. विनया कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि करिअर विषयी उपयुक्त माहिती दिली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता, योग्य आहार व जीवनशैली याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः किशोरवयीन मुलींना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत मोकळेपणाने संवाद साधत, त्यावरील प्रतिबंधक उपाय सुचवले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन, जेईई, नीट, सीईटी यांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली. अभ्यासाचे नियोजन, मानसिक तयारी आणि करिअर निवडीच्या पर्यायांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्न विचारले. डॉ. कांबळे यांनी त्यांच्या सर्व शंकांचे समाधानकारक उत्तर देत मार्गदर्शन सत्र अधिक प्रभावी केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग, मुख्याध्यापक कृष्णा कांबळे, शिक्षक आमिष भौड, भुरे , गायमुख आणि पन्हेळी हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य व शैक्षणिक जीवनात दिशा मिळाली असून, शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
..................
जी.एम. वेदक सायन्स कॉलेजचा १७ वा स्थापना दिवस उत्साहात
तळा (बातमीदार) ः जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा या प्रतिष्ठानाचा १७ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. निकम यांनी संस्थापक नंदकुमार वेदक यांच्या शिक्षणविषयक योगदानाचा गौरव केला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी उभारलेल्या संस्थेच्या कार्यावर भर दिला. प्रा. विवेक राणे, प्रा. डॉ. विजय रायकर व प्रा. मनस्वी वाढवळ यांनी विविध विभागांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महाविद्यालयात उपलब्ध संधींबद्दल माहिती दिली. या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ऋषिकेश मानकर (प्रथम), यश पैर (द्वितीय) आणि साई शिंदे व रोशनी सुर्वे (तृतीय) यांनी यश संपादन केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य डॉ. शाहीना मिर्झा, प्रा. जयदीप देवरे, प्रा. मनस्वी वाढवळ, सांस्कृतिक विभाग सदस्य संदीप राठोड व रिया राजपुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
.................
रायगड क्रिकेट पंच शिबिरात तज्ज्ञां‍चे मार्गदर्शन
पोयनाड (बातमीदार) ः रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉलमध्ये क्रिकेट पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दुसऱ्या सत्रातील प्रशिक्षणात बीसीसीआयचे पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे राजन कसबे, व क्रिकेट नियमतज्ञ नयन कट्टा यांनी मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्यातील ५० पंचांनी सहभाग घेतलेल्या या शिबिरात एमसीसी लॉज, एकदिवसीय, टी-२०, व मल्टी डेज क्रिकेटचे नियम प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये १०० दिवसांचे ऑनलाईन व प्रत्यक्ष सत्र घेण्यात येत असून २३ ऑगस्टला पंच परीक्षेचे आयोजन आहे. यावर्षी किमान ५०० सामन्यांचे नियोजन करण्यात येणार असून गतवर्षी ३२५ सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य कौस्तुभ जोशी, ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, विनोद सोळंकी यांच्यासह विविध प्रशिक्षक व पंच या शिबिराला उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात प्रशिक्षित पंचांची संख्या वाढवण्यासाठी आरडीसीएने सातत्याने प्रयत्नशील असून, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी पंचांच्या योगदानाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com