मुरूडमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध योजनांचा लाभ

मुरूडमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध योजनांचा लाभ

Published on

मुरूडमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध योजनांचा लाभ
मुरूड, ता. ७ (बातमीदार) ः राज्य शासनाच्या ‘महाराजस्व अभियान’अंतर्गत साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त मुरूड तहसील कार्यालयाच्या वतीने नागरिकांसाठी विविध योजनांचे लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून शेकडो लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.
दरबार हॉल येथे झालेल्या मुख्य शिबिरात मुरूड तहसीलदार आदेश डफल, नायब तहसीलदार संजय तवर, उपअधीक्षक भूमी अभिलेख विनोद काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात पंचायत समिती योजना, ॲग्रीस्टॅक योजना, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन महसूल विभाग, भूमी अभिलेख, राष्ट्रीय सूचनेचा विज्ञान केंद्र, गावठाण जमा बंदी प्रकल्प, स्वामित्व योजना, सनद वाटप, पुरवठा विभाग, रेशनिंग कार्ड सेवा, निवडणूक शाखा, सेतू सेवा, जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले, नगरपालिका सेवा, तसेच संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनांची माहिती व कागदपत्रे नागरिकांना प्रदान करण्यात आली. ई-सेवा केंद्रचालकांच्या माध्यमातून या सर्व सेवा काही तासांतच दिल्या गेल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ‘एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळाल्याने वेळ, श्रम आणि खर्च वाचला,’ अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
याशिवाय, नांदगाव पंचक्रोशी आगरी समाज सभागृह, यशवंतनगर येथे आणि बोर्ली मंडळातील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, भोईघर येथेही महसूल विभागाच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी महसूल नायब तहसीलदार संजय तवर यांच्या उपस्थितीत उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मुरूड येथे आयोजित शिबिरात उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आले. तहसीलदार आदेश डफल यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com