निसर्गसाज चढलेलं गांगवलीतील वैजनाथ तीर्थक्षेत्र !
निसर्गसाज चढलेले गांगवलीतील वैजनाथ तीर्थक्षेत्र!
श्रावणात भक्ती, निसर्ग आणि अध्यात्माचा मिलाफ
माणगाव, ता. ८ (बातमीदार) : माणगाव तालुक्यातील गांगवली गावाच्या कुशीत वसलेले प्राचीन वैजनाथ महादेव मंदिर सध्या श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्याने खुललेले आहे. सभोवतालच्या हिरव्या डोंगररांगा, मंदिराजवळून वाहणारी नितळ नदी आणि घनदाट वृक्षराजी यामुळे या तीर्थक्षेत्राला एक आध्यात्मिक तेज लाभले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे वातावरण भक्तिमय झाले असून, श्रद्धाळूंना येथे एक विलक्षण शांततेचा अनुभव मिळतो.
हे मंदिर शतकानुशतके भक्तीचे केंद्र राहिले असून, श्रावण महिन्यात येथे विशेष उत्साह असतो. दर सोमवारी आणि शनिवारी येथे मोठ्या संख्येने भाविक महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिराच्या गाभाऱ्यात घंटानाद आणि मंत्रोच्चाराचा गूंज दर आठवड्याला या ठिकाणाचे पावित्र्य अधिक गहिरे करत असतो. नुकतेच काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी मंदिरात भेट देऊन महाआरतीत सहभाग घेतला. या वेळी पुजारी विष्णू दाखिणकर यांच्या हस्ते पूजा-अर्चा करण्यात आली. मंदिराच्या व्यवस्थापनात विश्वस्त ज्ञानदेव दाखिलकर, बाळकृष्ण दाखिणकर, संतोष दाखिणकर, रामदास दाखिणकर यांच्यासह गांगवलीतील नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिर्के आणि मुकुंद वाढवळ यांच्या प्रयत्नातून परिसरात स्वच्छता व भक्तीचे वातावरण निर्माण केले जाते.
.......................
ध्यानधारणेसाठी आदर्श जागा
श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर मंदिरात अभिषेक, आरती, पारायण व भजनसंध्या यांसारख्या उपासना नियमितपणे होतात. मंदिर परिसर स्वच्छ, निसर्गरम्य आणि शांत असल्याने येथे येणाऱ्या भक्तांना ध्यानधारणेसाठीही एक आदर्श जागा मिळते. गांगवलीतील हे वैजनाथ मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून, तीर्थक्षेत्र, आध्यात्मिक ऊर्जा आणि निसर्ग यांचे एकत्रित प्रतीक असल्याचे बोलले जात आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाच्या सहजीवनातून हे मंदिर आजही अनेकांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करत आहे. श्रावण महिन्यात मंदिराचे हे रूप पाहणे म्हणजे भक्तिमार्गाच्या एका अलौकिक प्रवासाचा अनुभव घेणे होय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.