पाच महिन्यांपासून रोजगार सेवक मानधनाविना

पाच महिन्यांपासून रोजगार सेवक मानधनाविना

Published on

मोखाडा, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यातील २७ ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४२ रोजगार सेवकांचे डिसेंबरपासून पाच महिन्यांचे मानधन सरकारने थकवले आहे. त्यामुळे रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी या रोजगार सेवकांनी बुधवार (ता. ६)पासून संपाचे हत्यार उपसले आहे. तालुक्यात नरेगाचे काम थांबवले आहे. त्यामुळे या निगडीत सर्व विभागांच्या रोहयोच्या कामांना खीळ बसली असून, त्याचे परिणाम मजुरांच्या कुटुंबाला भोगावे लागत आहेत.

२००६ पासून रोजगार सेवक नरेगाचे काम करीत आहेत. सातत्याने मानधन प्रलंबित राहात असल्याने कौटुंबिक वातावरण ढवळून निघत असून, अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे रोजगार सेवक सांगत आहेत. डिसेंबरपासून आजतागायत पाच महिने मानधन मिळाले नसल्याने केवळ नाइलाजास्तव संप करावा लागत आहे. सरकारने तातडीने दखल घेऊन आमचे मानधन एकरकमी अदा करावे, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने केली आहे. त्याशिवाय दोन वर्षांपासूनचा प्रवास व अल्पोहार भत्ताही प्रलंबित आहे. तो त्वरित देण्यात यावा, नवीन शासन निर्णयानुसार मानधन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तालुक्यातील रोजगार सेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.

नरेगा योजनेचा कणा असलेल्या रोजगार सेवकांनी काम करूनदेखील त्यांना पाच महिन्यांपासून एक छदामही देण्यात आलेला नाही. त्यामुळे एकूणच रोजगार सेवकांनी योजनेकडे पाठ फिरवली असल्याने मजुरी मिळेल तेव्हा मिळेल, पण कामाच्या आशेवर कुटुंबकबिल्यासह तालुक्यातच तग धरून राहिलेल्या मजूरवर्गाच्या हाताला काम मिळणे दुरपास्त होणार आहे. त्यामुळे सरकारने रोजगार सेवक आणि पर्यायाने मजुरांवर ओढवणाऱ्या उपासमारीचा तातडीने विचार करून मानधन अदा करण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

हलाखीमध्ये जगण्याची वेळ
प्रदीर्घकाळ मानधनाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने आम्ही कुटुंबांचा चरितार्थ चालवण्यासाठी अक्षरशः दागिने गहाण ठेवले आहेत. त्यात आमचे कर्जाचे हफ्ते थकले असून, अत्यंत हलाखीत जीवन जगावे लागत आहे. आता आमचा कणाच मोडून पडण्याची वेळ आल्याने सरकारने थकीत मानधन अदा करावे, अशी रोजगार सेवक भगवान कचरे यांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com