पोशीर, शिलार धरणाच्या कामाला गती
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई आणि उपनगरात भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पोशीर आणि शिलार ही धरणे आकार घेत आहेत. धरणाच्या कामाला सरकारकडून गती मिळाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने या दोन्ही धरणांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर केल्या आहेत. पोशीर धरणासाठी दोन हजार १३५ कोटी रुपयांची, तर शिलार धरणासाठी एक हजार ६६७ कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. या प्रकल्पांचे काम येत्या पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
राज्याचा विचार केला, तर मुंबई आणि उपनगरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यात या वाढीव लोकसंख्येला पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी नव्या जलस्रोतांची उभारणी मात्र अगदी धीम्या गतीने होत आहे. ठाणे आणि उपनगरांना पिण्याच्या पाण्याचा नवा स्रोत म्हणून काळू धरण प्रस्तावित आहे. १३ वर्षे होऊनही हा प्रस्ताव अजून कागदावरच आहे. त्यासाठी निधीची तरतूद असली तरी प्रत्यक्ष कामात अनेक अडथळे आहेत. त्याच वेळी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील संयुक्तपणे विभागलेले उल्हास नदीचे खोरे मात्र याबाबत दुर्लक्षित होते. उल्हास नदीवर एकही धरण नाही. भौगोलिक रचना पोषक नसल्याने नदीवर थेट धरण बांधण्यात मर्यादा येत आहेत; मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.
उल्हास नदीच्या खोऱ्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो; मात्र पाण्याचा साठा होत नसल्याने समुद्रात वाहून जाते. कर्जत ते ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगरपर्यंत उल्हास नदीला चिल्हार आणि पोशीर या उपनद्या येऊन मिळतात. या नदीवर धरण बांधून त्याचा वापर करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासूनचा होता. चिल्हार आणि पोशीर नद्यांवर आता राज्य सरकारने अनुक्रमे शिलार आणि पोशीर ही धरणे प्रस्तावित केली. त्यात पोशीर धरणाची क्षमता १२.३४ टीएमसी, तर शिलार धरणाची क्षमता ६.६१ टीएमसी इतकी असणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या कोकण पाटबंधारे विभागाने या दोन्ही धरणांच्या उभारणीसाठी आता निविदा जाहीर केली आहे. पोशीर प्रकल्प आणि शिलार प्रकल्पातील धरण, सांडवा प्रणाली आणि पाणीपुरवठा; तसेच विद्युत विमोचक आणि इतर आनुषंगिक बाबींचे बांधकाम करण्यासाठी या निविदा जाहीर केल्या आहेत. या कामासोबतच केंद्र सरकार, वन व पर्यावरण तथा वातावरणीय बदल विभागाकडून वनजमीन वळती करण्यास मान्यता प्राप्त करणे आणि खासगी भूसंपादन प्रस्ताव तयार करणे, या कामांचाही समावेश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय हे काम पूर्ण झाल्यास २०३०पर्यंत या धरणांचे पाणी शहरांना मिळू शकते.
पूर परिस्थितीला आळा
गेल्या काही वर्षांत उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, उल्हासनगर या तालुक्यांतील शहरे आणि गावांना मोठा फटका बसला. उल्हास नदीच्या उपनद्या असलेल्या पोशीर आणि चिल्हार नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होते; मात्र आता ही दोन धरणे प्रत्यक्षात उभारली जाणार असल्याने भविष्यात पूरस्थितीवरही नियंत्रण मिळवता येईल.
दृष्टिक्षेप
धरण पाणी क्षमता निविदा किंमत
पोशीर १२.३४ टीएमसी दोन हजार १३५ कोटी
शिलार ६.६१ टीएमसी एक हजार ६६७ कोटी
शहरांची तहान भागणार
पोशीर आणि शिलार धरणांच्या उभारणीमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई महापालिका क्षेत्र, पनवेल, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांची तहान भागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.