स्मार्ट राखीतून कोट्यवधीची उलाढाल
स्मार्ट राखीतून कोट्यवधींची उलाढाल
स्मार्ट रक्षाबंधनाकडे बहीण-भावांचा कल
संतोष दिवाडकर : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ७ : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण. यंदा शनिवारी (ता. ९) हा सण साजरा होत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये राखी खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी दिसत असली तरी बदलत्या तंत्रज्ञानामुळे ‘स्मार्ट रक्षाबंधन’ साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. विशेषतः सासरी असलेल्या किंवा दूर राहणाऱ्या बहिणी आता ऑनलाइन राख्यांद्वारे भावाशी नाते जपताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा राखी व्यवसाय अंदाजे १७ हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
सणाचे आधुनिक स्वरूप लक्षात घेता २०१८मध्ये राखी व्यवसाय सुमारे तीन हजार कोटी रुपये इतका होता; मात्र सात वर्षांत तो वाढून यंदा अंदाजे १७ हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यातील सुमारे १,२०० कोटी रुपयांची राखीविक्री केवळ ऑनलाइन माध्यमातून होणार असल्याचे व्यापार संघटनांनी नमूद केले आहे. राखी व्यवसाय मागील सात वर्षांत तब्बल पाचपट वाढला आहे. राखी खरेदीसाठी यंदा विविध ई-कॉमर्स कंपन्यांची विशेष तयारी आहे. दूर अंतरावर राहणाऱ्या बहिणी थेट भावाच्या पत्त्यावर राखी पाठवू शकतात. त्याचप्रमाणे भावाकडूनही डिजिटल गिफ्ट कार्ड, खरेदी कूपन यांचे प्रमाण वाढले आहे. वेळ, कुरिअरचा खर्च आणि प्रवास टाळता येत असल्याने डिजिटल माध्यमांमध्ये पसंती मिळते आहे.
ग्राहक जागरूकता, कस्टमाइज्ड डिझाइन्स आणि हाय-व्हॅल्यू राख्यांना ऑनलाइन मागणी वाढली आहे. भेटवस्तू बंडल, सिल्व्हर आणि डिझाईनर राख्या तसेच थेट घरपोच डिलिव्हरीच्या सोयीमुळे ऑनलाइन खरेदी जोरात आहे. पूर्वी दूर ठिकाणी असलेल्या भावाला राखी पाठविण्यासाठी कुरियर अथवा पोस्टाचा पर्याय निवडला जायचा. यात वेळ आणि पैसे खर्चही होत असे. यंदा मात्र हे प्रमाण कमी झाले असून, ई-कॉमर्स साइटवरून थेट खरेदी करून ही राखी परस्पर भावाच्या पत्त्यावर पाठवून दिली जाते. तर भावाकडूनही ऑनलाइन भेटवस्तू अथवा खरेदी कुपन पाठवून दिले जाते. यंदा ऑनलाइन राखीविक्री सुमारे १,२०० कोटींच्या आसपास राहू शकते. ही आकडेवारी दरवर्षी २५ ते ३५ टक्के वेगाने वाढत आहे. ऑनलाइन गिफ्ट, समाजमाध्यम विक्री आणि ई-कॉमर्स फेस्टिव्हल ऑफर्समुळे या विक्रीचा वेग वाढला आहे.
आमच्या दुकानातून अनेक वर्षांपासून आम्ही राख्या विकत आहोत. बदलत्या काळानुसार आता दोन वर्षांपासून ऑनलाइन विक्रीदेखील सुरू केली आहे. यंदा दुकानातून ४००-४५० राख्यांची विक्री झाली असून, ३००-३५० राख्या ऑनलाइन विकल्या गेल्या आहेत. ऑनलाइन विक्रीचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याने नुकसान टाळण्यासाठी दोन्ही पर्याय आम्ही ठेवले आहेत.
- गणेश चंद्रकांत पंडित, राखी व्यावसायिक
विविध डिजिटल माध्यमांवरील सवलतीमुळे राख्यांची ऑनलाइन डिलिव्हरी सुरू आहे. त्यामुळे दुकानदारांना मोठा फटका बसत असून, दुकानात राखी खरेदीसाठी गर्दी कमी झाली आहे.
- ओमकार चासकर, ग्राहक