निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा राजकीय हंडी
वसई, ता. ७ (बातमीदार) : राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण सरसावू लागले आहेत. पक्षातील अंतर्गत नाराजी, सत्तेतील पक्षात असल्यामुळे विकास कामे करणे शक्य, तसेच निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक आपली राजकीय भूमिका बदलू लागले आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप सुरू झाला आहे. शहरात पक्षांतरासह प्रवेशाची राजकीय हंडी फुटू लागली असल्याची चर्चा आहे.
लवकरच वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. सद्य:स्थितीत प्रशासक राजवट आहे, तर नालासोपारा आणि वसईमध्ये भाजपचे आमदार आहेत. विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार बाहेर पडले आहेत, तर बहुजन विकास आघाडीची महापालिकेतील सत्ता अबाधित राहिली आहे, परंतु गेल्या पाच वर्षांत निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींना अधिकार उरले नाहीत. अशातच पक्षीय वातावरण, संघटना वाढीकडे प्रत्येक राजकीय पक्ष बारकाईने पाहू लागला आहे. काही दिवसांपूर्वी बविआ संघटक, सचिव अजीव पाटील आणि माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या उपस्थितीत विरार पूर्वेकडील शेकडोंच्या कार्यकर्त्यांचे संख्येने इनकमिंग झाले. त्यामुळे पुन्हा पक्षवाढीचे संकेत मिळाले, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतदेखील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला, तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतदेखील प्रवेश सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह अन्य पदाधिकाऱ्यांचा राजकीय पक्षांतराचा प्रवास थांबला नसून भाजपने एक धक्का मंगळवारी (ता. ५) दिला. बविआचे तीन माजी नगरसेवक, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र बदलले गेले आहे, तर भाजप, शिवसेना पालिकेवर आमचा झेंडा फडकणारच, असा एल्गार करत आहेत. बविआकडून देखील संघटना बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गल्लोगल्ली कार्यकर्ते फिरत आहेत. माजी लोकप्रतिनिधी समस्या जाणून घेत असून महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना, तसेच थेट आयुक्तांना भेटी देत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.
वसई-विरार महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय भूकंप येणार आहेत. पक्षांतर, पक्षप्रवेशाला वेग आला आहे. त्यामुळे विविध पक्षांत किती कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा माजी लोकप्रतिनिधी जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तिकिटांसाठी इच्छुक
महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रभागामध्ये प्रतिस्पर्धी निर्माण होऊ लागल्याने तिकीट कोणाला मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे अन्य पक्षांत जाऊन तिकीट घेऊन निवडणुकीत उभे राहण्यासाठीदेखील पक्षप्रवेश केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आम्ही विकासाची दिशा पाहून पक्षप्रवेश करत आहोत, असे इच्छुक उमेदवारांकडून सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.