फाळणीच्या वेदनेतून उगमलेले संघर्षाचे वैभव!

फाळणीच्या वेदनेतून उगमलेले संघर्षाचे वैभव!

Published on

उल्हासनगर शहर स्थापना दिन विशेष


नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ७ : ‘जिथं आठवणी होत्या, पण घर नव्हतं.. जिथं श्रद्धा होती; पण देवालय नव्हतं आणि जिथं स्वप्न होतं; पण जमीन नव्हती. तिथंच उगमलं ‘उल्हासनगर’!’
दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून उगमलेले, फाळणीने आयुष्य उद्ध्वस्त झालेल्यांसाठी आश्रय बनलेले आणि निर्वासितांच्या अश्रूंना जिद्दीच्या मशालीत रूपांतरित करणाऱ्या सामूहिक संघर्षाची साक्ष देणारे शहर म्हणजे ‘उल्हासनगर!’

--------------------------
८ ऑगस्ट १९४९ मध्ये एका लष्करी छावणीपासून सुरू झालेला हा प्रवास, आज ७६ वर्षांनंतर एक समृद्ध, सुसंस्कृत आणि गतिमान महानगर म्हणून आपल्या देशाच्या शहरी इतिहासात अभिमानाने उभा आहे. हे शहर केवळ सिमेंट-काँक्रीटने उभे राहिलेले नाही, तर श्रद्धा, परिश्रम, व्यवसायवृत्ती आणि सामाजिक एकात्मतेच्या घटकांनी बांधलेले आहे. ज्यांच्या हातात काहीच नव्हते, त्यांनी डोळ्यांत स्वप्ने भरून या भूमीत पाऊल ठेवले आणि स्वतःच्या श्रमांतून ‘कल्याण कॅम्प’चे रूपांतर ‘उल्हासनगर’ या भारताच्या ऐतिहासिक शहरात केले. आज आपण या ७६ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. इतिहास, विस्थापन, संस्कृती, श्रद्धा, शिक्षण, उद्योग, प्रशासन, आरोग्य, अन्नसंस्कृती, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आणि भविष्याचा वेध घेणारा हा विशेष लेख केवळ माहितीचा दस्तऐवज नाही, तर हे आहे लाखोंच्या जिद्दीचे स्मरणगान!
भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या दोन वर्षांनी देशाने एका नव्या शहराच्या जन्माचा साक्षीदार होण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवला. हे शहर म्हणजे उल्हासनगर. आज उल्हासनगर आपला ७६वा स्थापना दिन साजरा करत आहे. द्वितीय महायुद्धाच्या काळात, सुमारे १३ चौ.कि.मी. परिसरात ब्रिटीश सैन्याने कल्याण कॅम्प या नावाची एक मोठी लष्करी छावणी उभारली होती. इथून सैनिकांना युद्धभूमीवर पाठवले जायचे. युद्ध संपल्यावर ही छावणी ओस पडली. मग १९४७ मध्ये भारत-पाक फाळणीनंतर सिंध प्रांतातून आलेल्या सुमारे ९४ हजार निर्वासित हिंदूंना या निर्जन भागात वसवण्यात आले. हे निर्वासित नुसतेच आपल्या मातृभूमीपासून तोडले गेले नव्हते, तर त्यांनी आपले घर, ओळख, संपत्ती आणि सर्वस्व गमावले होते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहराचा जन्म हा केवळ शहरनिर्मिती नव्हता, तर माणूसपणाचा, संयमाचा आणि नव्याने उभे राहण्याच्या जिद्दीचा एक पवित्र संकल्प होता.
८ ऑगस्ट १९४९ मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते या नव्याने वसवलेल्या वसाहतीची कोनशिला रोवण्यात आली. ‘कल्याण कॅम्प’चे नाव बदलून उल्हासनगर ठेवले. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर पुढे आशेचा आणि उद्योजकतेचा चेहरा बनला. सुरुवातीला बाराकी, तात्पुरत्या झोपड्या आणि तुटपुंज्या सोयींमध्ये जगणाऱ्या लोकांनी आपापल्या कष्टातून हे शहर घडवले. अल्पावधीतच आगे दुकान, पीछे मकान अशा म्हणीप्रमाणे व्यावसायिक संस्कृती येथे रुजली. त्यातून वाढलेला व्यवसाय आणि कालांतराने हेच शहर संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले.
सध्या उल्हासनगर महानगरपालिका हे संपूर्ण प्रशासन सांभाळते. त्याचे क्षेत्रफळ फक्त १३.०४ चौरस किलोमीटर असून सुमारे सात लाख लोकसंख्येचे व्यवस्थापन हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. तरीही प्रशासनाने डिजिटल पद्धतीने सेवा देणे, स्वच्छता मोहिमा, जल व्यवस्थापन, महिला व बालकल्याण, आरोग्य केंद्रे उभारणे, अशा विविध क्षेत्रांत लक्ष केंद्रित केले आहे.


शिक्षणाचा पायाही भक्कम
शहराचा सामाजिक व सांस्कृतिक चेहरा जसा मजबूत आहे. तसाच शिक्षण आणि उद्योगधंद्यांचा पायाही भक्कम आहे. येथे स्थापण्यात आलेल्या सीएचएम कॉलेज, आरकेटी महाविद्यालय, एस.एस.टी. कॉलेज, न्यु ईरा स्कूल, सिंधु एज्युकेशन सोसायटी, स्वामी शांतिप्रकाश आश्रम, यशवंत विद्यालय, उल्हास विद्यालय, महाराष्ट्र मित्र मंडळ, आर.के. अभंग यांसारख्या अनेक संस्थांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. शिक्षण हे केवळ अक्षर ओळख नसून चारित्र्य घडवण्याचे कार्य आहे, याची प्रचिती उल्हासनगरमधून घडलेल्या डॉ. दयाल आशा (सिंधी साहित्यातील पहिले डी.लिट. मानकरी), अंध आयएएस अधिकारी प्रांजल पाटील, आंतरराष्ट्रीय नृत्यांगना अनिला सुंदर आणि यू-ट्युब स्टार आशीष चंचलानी यांच्या यशोगाथांमधून मिळते.

‘छोटा यूएसए’
उद्योगधंद्याच्या दृष्टीने उल्हासनगर हे एक स्वतंत्र ओळख असलेले शहर आहे. १९५० नंतर येथे जीन्स, फॅब्रिक, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, लोणची-पापडपासून ते साड्या, होजियरी, प्लास्टिक वस्तू, तसेच हार्डवेअर उत्पादनांपर्यंतचे शेकडो लघुउद्योग सुरू झाले. विशेषतः उल्हासनगर ५ येथील जीन्स मार्केट तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. व्यापारी म्हणतात “आम्ही नफा कमी, विक्री जास्त” या तत्त्वावर काम करतो. त्यामुळे इथून देशभरात सामान जाते आणि उल्हासनगरचे मार्केट देशातील टॉप ग्रे मार्केटपैकी एक मानले जाते. ‘छोटा यूएसए’ असे गमतीने इथल्या व्यापाऱ्यांचे वर्णन केले जाते.

विकासाकडे वाटचाल
दळणवळणाच्या दृष्टीने उल्हासनगरची स्थिती उत्कृष्ट आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड ही तीन रेल्वे स्थानके शहराला मुंबई, नाशिक आणि पुण्याशी जोडतात. मध्य रेल्वेच्या या मार्गावरून हजारो लोक रोज प्रवास करतात. रस्ते वाहतुकीसाठी सुसज्ज रस्त्यांचे जाळे आहे. महापालिकेच्या नियोजनात सध्या मोठ्या उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटी योजनेखाली स्मार्ट सिग्नल, सीसीटीव्ही, एलईडी स्ट्रीटलाईट, आणि नवीन उद्याने उभारण्याचे प्रस्ताव आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना शहराच्या जीर्ण बांधकामांवर उपाय म्हणून कार्यरत आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांचे ईएसआयसी रुग्णालय विकास, उल्हासनगर महापालिकेचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा आणि वनसंकल्पना राबवली जात आहे.


७६ वर्षांपासून अखंड पवित्र ज्योत
सामाजिक संस्थांपासून शिक्षण संस्था, आरोग्य सेवा, मंदिर ट्रस्ट, गुरुद्वारे, समाजभवन हे सर्व उल्हासनगरकरांनी स्वबळावर उभे केले. झुलेलाल हे इथल्या सिंधी समाजाचे श्रद्धास्थान आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील पूज्य चालिया मंदिरात आजही ७६ वर्षांपासून अखंडपणे पेटती पवित्र ज्योत ही त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. ही ज्योत सिंध प्रांतातील पीरघोट येथून विभाजनावेळी आणण्यात आली होती. या ज्योतीला भारताच्या अनेक विक्रम पुस्तकांमध्ये स्थान मिळाले आहे. दरवर्षी येणारा ४० दिवसांचा चालिया उत्सव म्हणजे उल्हासनगरच्या आध्यात्मिक चेतनेचा जिवंत साक्षात्कार असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com