डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाकडून उपग्रह संकुलासाठी प्रस्ताव
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाकडून उपग्रह संकुलासाठी प्रस्ताव
१० हजार चौरस फुटाच्या जागेची मागणी
मुंबई, ता. १० ः राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाने (एचबीएसयू) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत नवनवीन शाखा, तंत्रज्ञानाविषयक अभ्यासक्रमांच्या कक्षा अधिकाधिक विस्तारल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून उपग्रह संकुल स्थापन करण्यासाठी मुंबईलगत अथवा जवळच सुमारे १० हजार चौरस फुटाची जागा हावी, यासाठीची मागणी केली असल्याचे शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
विद्यापीठाला या उपग्रह संकुलासाठीचीही ही जागा शहरातील रेल्वे नेटवर्कशी चांगल्या प्रकारे जोडलेल्या ठिकाणी हवी आहे. यातून शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या संकुलात शिक्षण घेण्यासाठी सोयीस्कर होईल. यातून विद्यापीठाचा विस्तार होईल. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते.
मागील तीन वर्षांत विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती केली असून, एनईपीची १०० टक्के अंमलबजावणी करीत विद्यापीठाने तब्बल ३० हून अधिक शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यात २० विषयांमध्ये पीएचडीचा समावेश आहे. विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, लक्झरी ब्रँड व्यवस्थापन, ग्रीन इकॉनॉमी, हेल्थ इन्फॉर्मेटिक्स अशा क्षेत्रांत ३०हून अधिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये शिकाऊ प्रशिक्षण (इंटर्नशिप) समाविष्ट असून, विद्यार्थ्यांच्या रोजगारयोग्यतेत मोठी वाढ होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी दिली.
एनईपीमध्ये अपेक्षितप्रमाणे विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडवणे आणि त्यांना विविध क्षेत्रांत जागतिक पातळीवर स्पर्धेसाठी सज्ज करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठाने शाश्वत विकास, डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्पर्धेचा मार्ग मोकळा केला आहे. उपग्रह केंद्र स्थापन झाल्यास हे शिक्षण आणखी व्यापक आणि सर्वसमावेशक होईल, असा विश्वासही कुलगुरू डॉ. कामत यांनी व्यक्त केला.
सर्जनशील अर्थव्यवस्थेचे आकर्षण
विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमांमध्ये ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’ हे विशेष आकर्षण ठरणार आहे. या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना सर्जनशील उद्योग, मीडिया, डिझाईन, साहित्य, संगीत आणि कला यामधील अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून त्यातून उद्योजकता व कौशल्यविकास साधता येणार आहे. पर्यावरण व शाश्वत विकासाशी निगडित आंतरशाखीय अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये कार्बन फूटप्रिंटचे व्यवस्थापन, पर्यावरणीय अर्थशास्त्र, शाश्वत विकास धोरणे यांचा समावेश आहे.