लाडकी बहीण याेजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य!
लाडकी बहीण याेजनेमुळे
महिलांना आर्थिक स्वातंत्र्य!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; ‘सकाळ’च्या ठाणे कार्यालयाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले; पण गेल्या वर्षी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. धनादेशावर सही करण्याचे स्वातंत्र्य लाखो महिलांना मिळाले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला हाती येणाऱ्या दीड हजार रुपयांतून अनेक महिलांनी आपला स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. अशा अनेक यशोगाथांची उदाहरणे आहेत. त्यामुळे ही योजना यापुढेही अशीच सुरू राहील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा दिली.
‘सकाळ’च्या ठाणे शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशाबद्दल माहिती दिली. अडीच वर्षांपूर्वी आपण जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला, तेव्हा हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याचे वारंवार सांगत होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा दिला पाहिजे, ही धारणा आपल्या मनाशी पक्की होती. शेतकरी, कष्टकरी घटकांसाठी अनेक योजना आपण आणल्या; पण तळागाळातील आपल्या लाडक्या बहिणींनाही आर्थिक सक्षम करणे गरजेचे होते. त्यातूनच लाडकी बहीण योजना आपण सुरू केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
ही योजना सुरू असताना अनेक सावत्र भाऊ विरोध करण्यासाठी उभे राहिले. आचारसंहितेमुळे ही योजना रखडेल, अशी आवई उठवण्यात आली; पण सरकारने आगाऊ हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा लाडक्या बहिणींनी दाखवून दिली. त्यानंतर पुन्हा ही योजना बंद होणार, असा अपप्रचार सुरू केला. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही योजना यापुढेही अशीच सुरू राहील. त्याचवेळी लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर उभे कसे राहता येईल, यासाठीही प्रयत्न केले जातील, असे शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींना केवळ दर महिन्याला दीड हजार देणे हा या योजनेचा हेतू नाही. वास्तविक राज्यात अशा लाखो महिला आहेत, ज्यांचे बँकेत खाते नव्हते. त्यांना धनादेशावर सही करण्याचा अधिकार नव्हता; पण या योजनेमुळे हा अधिकार त्यांना पहिल्यांदाच मिळाला. म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. या पैशांमुळे सणासुदीला किंवा अडीअडचणीला त्यांना कुणासमोर हात पसरायला लागत नाही. उलट त्यांच्या हाती पैसे असल्यामुळे घरात त्यांना मान मिळू लागला आहे. काही लाडक्या बहिणींनी या पैशातून आपला छोटासा व्यवसायही सुरू केला आहे. शंभर महिलांनी एकत्र येऊन सोसायटी सुरू केली. काही महिलांनी बँकेत पैसे गुंतवले आहेत, याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
‘स्थानिक’ निवडणुकांतही आशीर्वाद मिळेल!
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचे आशीर्वाद मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते मिळतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणारच. आमच्याकडे ‘प्रिंटिंग मिस्टेक’ हा प्रकार नसल्याचेही शिंदे म्हणाले. त्यामुळे लाडक्या बहिणींना भविष्यात वाढीव रक्कम मिळण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
लाडक्या सुनांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन!
हुंडाबंदी असली तरी अनेक ठिकाणी ही कुप्रथा सुरू आहे. त्यामुळे अनेक सुनांना सासरी शारीरिक, मानसिक छळ सहन करावा लागतो. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी लाडक्या सुनांच्या सुरक्षेसाठी लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ही यंत्रणा कशी उभारायची यावर काम सुरू आहे. हेल्पलाइनवरील एका रिंगवर मदतीसाठी पोलिस उभे राहतील. त्यामुळे अत्याचारी सासरच्या मंडळींनाही जरब बसेल, असेही त्यांनी सांगितले.
-----
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे ‘सकाळ’!
‘सकाळ’ हे वृत्तपत्र केवळ बातमी देण्यापुरते मर्यादित नाही, तर सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आहे, असे गौरवाेद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. कोविड काळ असो वा आपत्ती असो ‘सकाळ’ने मदतीचा हात देणारे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळेच ‘सकाळ’ आज नंबर एकचे वर्तमानपत्र बनले आहे. ऑनलाइन असो वा साम टीव्हीची घोडदौड असो ‘सकाळ’ने आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. या वृत्तपत्राचे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर आणि आता ही धुरा पुढे घेऊन जाणारे अभिजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही ते या वेळी म्हणाले. दरम्यान, आपण ‘सकाळ’ रोज वाचतो. सकाळी नाही जमले तरी सायंकाळी वाचतो; पण वाचतो, असेही शिंदे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.