पायाभूत सुविधांमुळे राज्याचा विकास
पायाभूत सुविधांमुळे राज्याचा विकास
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : आता कोंडीमुक्त रस्त्यांचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : पायाभूत सुविधांमुळे राज्याचा विकास होत असतो; कारण त्यातून राज्याच्या तिजोरीत उत्पन्न जमा होते. हे डोळ्यासमोर ठेवूनच राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासकामांना सुरुवात झाली आहे. हा विकास साधत असताना सर्वसामान्यांचा प्रवास खड्डेमुक्त आणि कोंडीमुक्तही कसा होईल, याकडे लक्ष दिले जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘सकाळ’च्या ठाणे येथील नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला. संपादक राहुल गडपाले यांना दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांना हात घातला. लाडकी बहीण योजनेबद्दल ते बोलले. लाडक्या बहिणींच्या यशाेगाथांना प्रसिद्धी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. उच्च शिक्षणासाठी फी भरण्याची ऐपत नसल्याने एका लेकीने आत्महत्या केली. ही घटना मनाला वेदना देऊन गेली आणि त्यातूनच लेक लाडकी योजनेचा जन्म झाला, अशी माहिती त्यांनी दिली. इंटर्नशिपच्या माध्यमातून तरुणांना नोकरी देणारी लाडका भाऊ योजना राबवण्याचा पहिला प्रयोग आपण केला, असेही ते म्हणाले. या सर्व योजना राबवत असताना विकासकामांची गतीही वाढवली, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
अटल सेतू, कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. आता ठाणे-बोरिवली बोगदा आणि उन्नत मार्गामुळे ठाणेही कोंडीमुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भिवंडी-वाडा मार्गाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. त्यालाही गती मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग काही ठेकेदारांमुळे रखडल्याचे ते म्हणाले. हा मार्गही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
सवलतींमुळे फायदा
आपण मुख्यमंत्री असताना बांधकाम व्यवसायाला सवलती दिल्या. त्या वेळी आपण बांधकाम व्यावसायिकधार्जिणे असल्याची टीका झाली. या योजनेमुळे केवळ बांधकाम व्यावसायिकांनाच नव्हे तर त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना त्याचा फायदा झाला. यात ग्राहक असो वा बांधकामांना माल पुरवणारे सिमेंट, रेतीवाले असो, यावर अनेक उपव्यवसाय अवलंबून असतात. या सवलतींमुळे राज्याच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई, ठाण्यात महायुतीच
राज्यात काही महिन्यांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा बार उडणार आहे. मुंबई आणि ठाण्यात महायुतीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या दोन्ही पालिका निवडणुका स्वतंत्र न लढवता महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
चांगले चेहरे पाहिले की आनंद होताे!
नुकतीच दिल्ली येथे अमित शहा यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराने घेतली. या वेळी शिंदे यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. याविषयी छेडले असता चांगले चेहरे पाहिले की आनंद होतो, असे ते म्हणाले. शहा यांच्यासोबत बैठकीत काय चर्चा झाली, याचे गुपित त्यांनी सांगणे टाळले.
सहाव्या रांगेवरून टीका
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या सादरीकरणावेळी ते सहाव्या रांगेत बसले होते. यावरून दिल्ली दरबारी त्यांची काय किंमत आहे, हे जनतेला कळले, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.