वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह

वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह

Published on

वैभवी शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
नेरूळ, ता. ९ ः नियोजनबद्ध शहराचा नावलौकिक असलेल्या नवी मुंबईत अनियोजित पार्किंगचे चित्र पाहायला मिळते. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात वाढलेल्या वाहनांमुळे विविध समस्या उद्भवत आहेत. पार्किंगसाठीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे प्रश्न जटिल झाला आहे. नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, बेलापूर, सानपाडा विभागात पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. नवी मुंबईतील मुख्य ठिकाणे, बाजारपेठ परिसर, रेल्वेस्थानकाजवळील बसथांबे तसेच निवासी भागातील मुख्य रस्त्यांवर वाहनांनी रस्ते, पदपथ व्यापल्याने पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण झाले आहे.
---------------------------------
रुग्णसेवेत अडचणी
शहरातील अनेक भागांत सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहतूक पोलिस कारवाईबरोबर दंडात्मक नोटिसा बजावत आहेत. तरीही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे.
------------------------
अपघातांमध्ये वाढ
वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सम-विषम पार्किंगची अट लागू करण्यात आली आहे. महिन्याच्या सम तारखेला रस्त्याच्या एका बाजूला व विषम तारखेला दुसऱ्या बाजूला वाहन पार्क करण्याची व्यवस्था आहे, परंतु वाहनचालक हा नियम पाळत नसल्यामुळे रस्त्यालगतची दुहेरी पार्किंग अपघातांना आमंत्रण देत आहे.
---------------------------
पदपथांवर अतिक्रमण
नवी मुंबई परिसरातील अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठीचे पदपथ बेकायदा वाहन पार्किंगमुळे व्यापले जात आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांकडून पदपथांवर गाड्या लावल्या जात असल्याने रस्त्यावरून चालण्याची वेळ येते.
-------------------------------
ध्वनी, हवेच्या प्रदूषणात वाढ
पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. यामुळे ध्वनीबरोबरच हवेतील प्रदूषणातही वाढ झाली आहे.
-----------------------------
भूखंडांवर वाहनांचे अतिक्रमण
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत असलेल्या वाहनतळाच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रहिवासी इमारती उभारण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर वाहनतळ बंद झाले आहे. त्यामुळे बाजारावर पार्किंगसाठी जागा मिळत रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग सुरू केली आहे. यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता हा वाहनांनी व्यापला आहे.
-----------------------------
बेकायदा पार्किंगची ठिकाणे
- रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसर
- रस्त्यांच्या दुतर्फा जागा, पदपथ, मर्जिनल स्पेस
- बेलापूर रेल्वेस्थानक कोकण भवन परिसर
- नेरूळ बस डेपो परिसर
- वाशी प्लाझा, वाशी सेक्टर-१७ परिसर
- मोराज सर्कल परिसर
- शाळा, कॉलेज परिसर
------------------------------------
वाहनतळांची गरज
- १३१ भूखंडांची मागणी.
- वाशी सेक्टर-३० तसेच सीबीडी सेक्टर-१५ येथे बहुमजली पार्किंग नियोजित.
- बेलापूर येथे ४५० गाड्यांचे बहुमजली पार्किंग.
------------------------------------
गाडी बाहेर काढण्यापूर्वीच पार्किंग करायची कुठे, हा प्रश्न डोक्यात येतो. नवी मुंबई शहर नियोजनबद्ध शहर असले तरी पार्किंगबाबत कोणतेही नियोजन नाही. सुरक्षित वाहनतळ नसल्यामुळे वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. यासाठी सिडकोने भूखंड देणे गरजेचे आहे.
- सुभाष गाडेकर, स्थानिक नागरिक
----------------------------------
सीवूड्स विभागात बेकायदा पार्किंगमुळे रहदारीस अडथळा होत असतो. अनेक ठिकाणी ‘नो पार्किंग’ क्षेत्र आहेत, परंतु वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्यामुळे रस्त्यालगतच वाहने उभी करावी लागतात.
- प्रशांत ताजणे, रहिवासी
---------------------------
शहरात रेल्वेस्थानक परिसर, शाळा, रुग्णालये या परिसरात वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. बेकायदा पार्किंगबाबत सातत्याने कारवाई करण्यात येत आहे, पण वाढती वाहनांची संख्या पाहता ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग
-----------------------------
वाहनांची संख्या
दुचाकी - ३,५५,०८३
चारचाकी - २,०३,९४४
प्रवासी वाहने - २३,८९२
रिक्षा - ३७,७२४
बस - ७,१७२
मालवाहू वाहने - ७८,३७८
इतर - ९,८५४
एकूण - ७,१६,१४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com