मध्यवर्ती अग्निशमन केंद्र टाळेबंद
शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. १० : वाढत्या लोकसंख्या व शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ व बदलापूर शहरांसाठी उभारण्यात आलेले मध्यवर्ती अग्निशमन केंद्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. वीज मीटर, नळजोडणी आणि औपचारिक उद्घाटन न झाल्याने हे केंद्र बंदच आहे. विशेष म्हणजे अग्निशमन गाड्यांसाठी उभारलेला शेड तोडण्याचा पालिकेचा असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. अंबरनाथ, बदलापूर शहरांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा देण्यासाठी बांधलेले हे केंद्र बंद असल्याने याचे लोकार्पण प्रलंबित राहणे ही प्रशासनाची उदासीनता दर्शवते, अशी टीका जनतेतून केली जात आहे.
शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामे, गॅस सिलिंडर गळती, शॉर्टसर्किट यांसारख्या घटनांमध्ये अग्निशमन दलाने अनेक जीव वाचवले आहेत. मात्र, वाढते शहरीकरण व टोलेजंग इमारती पाहता भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने त्रिसूत्री अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत केली आहे. यातील दोन अग्निशमन केंद्र कार्यान्वित आहेत. मात्र, एक अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
अंबरनाथ शहरात पश्चिम, पूर्व आणि एमआयडीसी या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये अग्निशमन केंद्र पालिकेच्या वतीने बांधण्यात आली आहेत. पूर्व परिसरात प्राचीन शिवमंदिर येथे अग्निशमन केंद्र आहे. पश्चिमेच्या परिसरात दुर्घटना घडल्यास चिंचपाडा येथे सुसज्ज अग्निशमन केंद्र बांधले असून ते कार्यरत आहेत. मात्र बदलापूर व अंबरनाथ या दोन शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मध्यवर्ती अग्निशमन केंद्र पालिकेच्या वतीने बांधले आहे. अद्याप हे केंद्र टाळे बंद आहे. अग्निशमन गाड्यांसाठी बांधलेला शेडही तोडण्याचा पालिकेचा मानस आहे. यात जनतेच्या पैशाचा चुराडा होत असल्याचेही बोलले जात आहे.
अंबरनाथ व बदलापूर शहराचा वाढता विकास व भविष्याची गरज ओळखून तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधीही मंजूर केला होता. त्याच निधीतून केंद्राची उभारणी करण्यात आली. मात्र, उद्घाटनाचा मुहूर्त काही ठरत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले हे केंद्र सध्या पडीक परिस्थितीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या केंद्राचे उद्घाटन करून कार्यान्वित करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
अंबरनाथ व बदलापूर शहरासाठी मध्यवर्ती अग्निशमन केंद्र असणे ही काळाची गरज आहे. यासाठी केंद्राचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. आता औपचारिक उद्घाटनासाठी वारंवार पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. या ठिकाणी वीज मीटर, पाणी जोडणी या महत्त्वाच्या सुविधा नाहीत. जोपर्यंत पालिका रितसर याचे लोकार्पण करत नाही, तोपर्यंत आम्हीही शासकीय वास्तू नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करू शकत नाही.
- भागवत सोनोने, अग्निशमन अधिकार
उडवाउडवीची उत्तर
पालिका अधिकारी राजेश तडवी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. अग्निशमन केंद्राचे बांधकाम झाले असून याची नागरिकांनाही माहिती आहे. मग औपचारिक उद्घाटनाची गरज काय? असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.