नवी मुंबईत रिक्षांची तिपटीने वाढ
नवी मुंबईत रिक्षांची तिपटीने वाढ
खुल्या परमिट नंतर २५ हजार २२४ रिक्षांची भर
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात परमिट दिल्याने रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खुले परमिट करण्याअगोदर नवी मुंबई उपप्राद्रेशिक परिवहन कार्यालयात १२ हजार ५०० रिक्षा होत्या, मात्र आजमितीस ३७ हजार ७२४ हजार रिक्षा या नवी मुंबईत आहेत. त्यामुळे रिक्षांची संख्या वाढल्याने धंदा कमी झाला आहे, अशी व्यथा रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईत १२ हजार ५०० जुन्या परमिटचे रिक्षाचालक आहेत. २०१७ पासून परमिट सर्वांसाठी खुले करण्यात आले. त्यात जवळपास २५ हजार २२४ नवीन रिक्षा परमिटचे वाटप केले आहे. मागील काही वर्षांपासून वाढलेली महागाई, कमी झालेली प्रवासीसंख्या आणि शहरात पसरलेले एनएमएमटी बसचे जाळे यामुळे रिक्षाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात दररोज नवीन रिक्षांची भर पडत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. शहरातील बेकायदा रिक्षा काही अंशी कमी झाल्या असल्या तरी जुन्या रिक्षांवरील परमिट उतरवल्यावर त्यात खासगी रिक्षांची भर पडली असून, हे सकाळी आणि रात्री व्यवसाय करतात. याची झळ बसत असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीओने महिलांसाठीही रिक्षाचे परवाने दिले आहेत. त्यांना अबोली रंगाच्या रिक्षा दिल्या आहेत. यामुळे नवी मुंबईत ८० महिलांना रोजगार मिळाला आहे. अबोली रिक्षा फक्त महिलाच चालवू शकत असल्या तरीही त्याऐवजी काळी पिवळी रिक्षा घेण्याकडेच महिलांचादेखील अधिक कल आहे, तर खुले परमिट झाल्यांनतर महिलांनीही रिक्षाकडे पाठ फिरवली आहे.
रिक्षाचालकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागणे गरजेचे आहे. नवीन परवाने दिले जात असले, तरी फक्त नवी मुंबईत रिक्षा चालवावी, असे त्यांना बंधन नाही. मुंबईसह शेजारील पालिका हद्दीत ते रिक्षा चालवू शकतात. रिक्षाच्या परमिटला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या बंद केल्या आहेत.
- गजानन गांवडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई
पूर्वीप्रमाणे रिक्षाचा धंदा राहिलेला नाही. महागाईमुळे अनेक प्रवासी रिक्षाचा प्रवास टाळत आहेत. त्यातच आता परमिट मिळत असल्याने रिक्षाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
- रवि मिडगुले, रिक्षाचालक
ज्याला हवा त्याला परवाना
परिवहन मंत्रालयाने नोव्हेंबर १९९७ मध्ये रिक्षा मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने ठरावीक मर्यादेबाहेर परवाने जारी होणार नाहीत, अशी तजवीज केली होती. यानंतर मात्र परवान्यांचा काळाबाजार सुरू झाला होता. त्यामुळे जून २०१७ मध्ये नवे धोरण जारी करत परवाने खुले करण्यात आले. ज्याला हवा त्याला परवाना देण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी अटी-शर्तीही शिथिल केल्या, मात्र ते खुले केल्यावर त्यांची संख्या वाढेल आणि प्रवाशांची गैरसोय टळेल हा त्यामागील उद्देश होता, असे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.