नेरुळ येथील पदपथांच्या झाकणांची दुरावस्था
नेरूळ येथील पदपथांच्या झाकणांची दुरवस्था
जुईनगर, ता. १२ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १२ येथील पदपथावरील झाकणांची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर ज्येष्ठ नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरात एनआरबी स्पोर्ट अकॅडमी, शिक्षण प्रसारक विद्यालय, गावदेवी मंदिर ज्येष्ठ नागरिक केंद्र आहेत. त्यामुळे या परिसरात क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची नियमित ये-जा असते. या ठिकाणच्या झाकणाचा काही भाग तुटून खड्डा पडला आहे, तर झाकणच अर्धवट गटारात झुकले असल्याने या ठिकाणाहून चालणे स्थानिकांना धोक्याचे वाटत आहेत, तर धोका टाळण्यासाठी झाकणांवर लाकडी प्लाय आणि तुटलेला फरशीचा तुकडा ठेवण्यात आला आहे. तरी धोका मात्र कायम असल्याचे बोलले जात आहे.
पालिका प्रशासनाकडून समोरच असलेल्या सेक्टर-१६ए च्या पदपथावरील झाकणे नुकतीच बदलण्यात आली आहेत. पालिकेकडून दुरवस्था झालेल्या झाकणांना बदलण्यात येते, असे सांगण्यात येते. मग या ठिकाणच्या झाकणांची दुरवस्था पालिकेला दिसत नाही का, असा सवाल नागरिक करत आहेत. त्यामुळे त्वरित या ठिकाणची झाकणे बदलण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या ठिकाणी नियमित विद्यार्थी ये-जा करत असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना तोल जाऊन अथवा पाय अडकून पडण्याची भीती वाटत आहे. या ठिकाणच्या धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थळांकडे जाताना याच पदपथाचा वापर होत असल्याने झाकणे बदलली जावीत, अशी साधी मागणी येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
आम्ही सकाळच्यावेळी चालण्यासाठी जात असताना या तुटलेल्या झाकणांची भीती वाटते. अनेक आमचे सहकारी काठीशिवाय चालू शकत नाहीत. अशावेळी येथून जाताना झाकणावर काठी ठेवताना दहा वेळा विचार करावा लागतो. त्यामुळे येथील झाकणे बदलणे अत्यावश्यक असल्याची आमची सगळ्यांचीच भावना आहे.
-शंकर शेवाळे, ज्येष्ठ नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.