अंबरनाथवासीयांची न्यायाची प्रतीक्षा संपली

अंबरनाथवासीयांची न्यायाची प्रतीक्षा संपली

Published on

अंबरनाथवासीयांची न्यायाची प्रतीक्षा संपली
चिखलोली येथील न्यायालयाचे उद्घाटन
अंबरनाथ, ता. ९ (वार्ताहर): अंबरनाथ व बदलापूरवासीयांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, चिखलोली येथे नवीन दिवाणी न्यायालय व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचे उद्घाटन शनिवारी (ता. ९) दिमाखात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, मंजुषा देशपांडे आणि अद्वैत सेठना यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

न्यायालयामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि परिसरातील नागरिकांना कल्याण, उल्हासनगरसारख्या दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचणार असून, जलद व पारदर्शक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यक्रमाचे आयोजन चिखलोली अंबरनाथ येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालय व ‘उल्हासनगर तालुका बार ॲडव्होकेट्स फाउंडेशन’चे अध्यक्ष ॲड. संजय सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता, लोकांचा वाढता विश्वास आणि जलद न्यायनिवाड्याचे महत्त्व अधोरेखित केले. न्यायालयाच्या स्थापनेमुळे लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. या न्यायालयामुळे अंबरनाथ आणि परिसरातील सामान्य नागरिकांसाठी ‘न्याय आता दारात’ आला असून, यापुढे न्यायासाठीची वाट अधिक सुलभ आणि सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सुविधायुक्त उभारणी
नवीन न्यायालयात प्रशस्त न्यायालयीन कक्ष, वकिलांसाठी स्वतंत्र जागा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेला साकार रूप देणारा हा प्रकल्प असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, वकील, वकिलीचे विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com