मासेमारीला हंगामाला सुरुवात

मासेमारीला हंगामाला सुरुवात

Published on

दर्याकडे कूच
नारळी पौर्णिमेचा मुहूर्त, बदलत्या वातावरणामुळे विलंब
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : समुद्रातील वादळी वारे, पावसामुळे यंदा मासेमारी हंगाम लांबणीवर पडला होता. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधत अलिबाग परिसरातील मच्छीमार मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करताना दर्याकडे कूच करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात जवळपास २७ हजार कामगारांचा या व्यवसायावर उदरनिर्वाह चालत असतो. वर्षभरात करोडोंच्या आसपास उलाढाल होत असते. त्यामुळे बंदी कालावधीत मच्छीमारांकडून बेकायदा मासेमारी सुरू होती. मासेमारीवरील शासकीय बंदीचा कालावधी १ ऑगस्टपासून संपला होता; परंतु खराब हवामानामुळे मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यामुळे मासेमारी नौका बंदरातच नांगरून होत्या; पण आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून वाऱ्याचा वेगही कमी झाल्याने हा कालावधी मासेमारीसाठी चांगला असल्याचे बोर्लीचे सागर नाखवा यांनी सांगितले. त्यामुळे नारळी पौर्णिमेपासून नव्या जोमाने मासेमारीला सुरुवात झाली आहे.
---------------------------------------------------
बाजारात ताजी मासळी
- रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मत्स्यउत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. प्रदूषण, हवामानातील बदल आणि बेकायदा मासेमारीचा यात समावेश आहे. २०२३-२४ मध्ये ही घट १२ हजार मेट्रिक टनाहून अधिक होती.
- मुरूड तालुक्यातील बोर्ली बंदर पापलेटसाठी प्रसिद्ध आहे. यंदा पापलेटची आवक चांगली राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर मांदेली, बोंबील असे ताजे मासे बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने ताज्या मासळीचे भाव आटोक्यात येणार आहेत.
----
प्रजाती संकटात
रायगड जिल्ह्याचा मासेमारी व्यवसाय गंभीर संकटात आहे. उत्पादन घटल्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. पापलेट, सुरमई, घोळ, रावस, शेवंड यांसारख्या उच्च बाजारभाव असलेल्या माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
----
रायगड जिल्ह्यातील परिस्थिती
वर्ष उत्पादन (मेट्रिक टन)
२०२२-२३ - ४०,६०१
२०२३-२४ - २८,०००
२०२४-२५ - ४२,०००
----
मत्स्यउत्पादनात सातत्याने होणारे चढ-उतार चिंतेचा विषय आहे. बंदी कालावधीत चार खलाशांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी मच्छीमारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
- संजय पाटील, सह मत्स्यव्यवसाय उपायुक्त, रायगड विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com