आशियातील सर्वात मोठा मद्यनिर्मिती प्लांट नागपुरात!
आशियातील सर्वात मोठा मद्यनिर्मिती प्लांट नागपुरात
दररोज ६० हजार लिटर उत्पादन; ६०० एकर क्षेत्रावर उभारणी
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : विदर्भाच्या औद्योगिक विकासात आता एक नवा ऐतिहासिक अध्याय जोडला जात आहे. आंतरराष्ट्रीय मद्यनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य फ्रेंच कंपनी पर्नोड रिकार्ड इंडिया नागपूरजवळील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून आशियातील सर्वात मोठा माल्ट स्पिरिट डिस्टिलरी व मॅच्युरेशन प्लांट उभारणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागपूरजवळील हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दररोज सुमारे ६०,००० लिटर माल्ट स्पिरिट (शुद्ध अल्कोहोल) तयार केले जाणार आहे. यामधून वर्षाला एकूण १३ दशलक्ष लिटर उत्पादन क्षमतेचा टप्पा गाठला जाईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प भारतात नव्हे तर संपूर्ण आशियात एक मोठे उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाईल. ६०० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणारे हे युनिट पर्नोड रिकार्डचे भारतातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र केवळ शेतीच नव्हे, तर औद्योगिक व सेवा क्षेत्रातदेखील ७०० ते ८०० थेट रोजगाराच्या संधी निर्माण करून देणार आहे. यासोबतच उत्पादन, वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल आणि सुरक्षेसारख्या क्षेत्रांत अप्रत्यक्षपणे हजारो रोजगार उपलब्ध होतील. यामध्ये स्थानिक युवकांना प्रशिक्षित करून त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.
५० हजार टन बार्ली खरेदी
प्रकल्पासाठी कच्चा माल म्हणून दरवर्षी ५०,००० टन बार्ली (जव) वापरण्यात येणार असून, यातील बहुतांश खरेदी स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट केली जाणार आहे. यामुळे ८० ते ९० हजार शेतकऱ्यांना बाजारभावावर उत्पन्न मिळेल तसेच शाश्वत शेती, दर्जेदार उत्पादन आणि दीर्घकालीन करारांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.