लाचखोरी नागरिकांच्या अंगवळणी
लाचखोरी नागरिकांच्या अंगवळणी
तक्रारी येत नसल्याने कारवाईही थंडावली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाईकडे नजर टाकल्यास लाचखोरी शासकीय कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांच्याही अंगवळणी पडू लागली आहे. अपेक्षित काम करून घेण्यासाठी चिरीमिरी द्यावीच लागते, त्यात गैर ते काय, हा समज सर्वसामान्यांमध्ये रुजल्याचे एसीबीकडे आलेल्या तक्रारी आणि त्याआधारे होणाऱ्या कारवायांची संख्याच स्पष्ट करते.
एसीबीने दोन दिवसांपूर्वी विनोबा भावेनगर पोलिस ठाण्यात नियुक्त महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री लोंढे यांना ताब्यात घेतले. तक्रारदार तरुण आणि त्याच्या साथीदाराविरोधात नोंद गुन्ह्यात सहकार्य करीन, अन्य गुन्ह्यात गोवणार नाही, असे सांगत एक लाख रुपयांची लाच मागितली. पुढे ५० हजार रुपयांवर तडजोड केली. लाचेची मागणी होताच तक्रारदाराने तातडीने एसीबीकडे तक्रार करणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता तक्रारदाराने लोंढे यांना प्रथम १५ हजार रुपये दिले. बहुधा ही रक्कम दिल्यावर प्रकरण मिटेल, असा तक्रारदाराचा समज होता; मात्र उरलेल्या ३५ हजार रुपयांसाठी लोंढे यांनी तगादा लावला. उर्वरित रक्कम दिल्याशिवाय जप्त केलेले मोबाईल सोडणार नाही, अशी भूमिका लोंढे यांनी घेतली. तेव्हा तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात १५ हजार लाच देणे तक्रारदाराला मान्य होते. त्यात त्याला काहीच गैर वाटत नव्हते; मात्र पोलिसाने उर्वरित रक्कम मागताच तक्रारदाराची सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाली आणि लाचखोरी गुन्हा असल्याचा साक्षात्कार झाला.
२०१४ मध्ये एसीबीने राज्यभर एक हजार २४५ तर २०१५ मध्ये एक हजार २३४ कारवाया केल्या. तेव्हा प्रवीण दीक्षित एसीबीचे प्रमुख होते. दीक्षित यांनी लाचखोरी हा गुन्हा आहे, याची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी, नागरिकांना अगदी सहजरीत्या तक्रार करता यावी, यासाठी बरीच धडपड केली होती. परिणामी, अधिकाधिक तक्रारी प्राप्त झाल्या; मात्र दीक्षित जाताच हा धाक कमी होऊ लागला. २०१७ नंतर लाचखोरीच्या तक्रारी आणि कारवाया आटू लागल्या. त्यामुळे गेल्या वर्षी ७२१ कारवाया झाल्या. यावर्षी ४ ऑगस्टपर्यंत ४३१ कारवाया झाल्या आहेत.
लाचखोरीत महसूल विभागाची मोठी झेप
गेल्या अनेक वर्षांपासून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्या क्रमांकावर आहे, तर पोलिस दल त्या खालोखाल. या दोन्ही विभागांमधील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात होणाऱ्या कारवायांत (प्रमाण) किरकोळ फरक असतो; मात्र यावर्षी महसूल विभागात एकूण १२३ सापळा कारवाया करण्यात आल्या. त्यात एकूण १८७ आरोपींना अटक करण्यात आली. या विभागातील अटक झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकूण ३९ लाख रुपयांची लाच मागितली, तर पोलिस दलात रचण्यात आलेल्या ६७ सापळा कारवायांमध्ये ९४ जणांना अटक झाली. त्यात ७९ पोलिस अधिकारी, कर्मचारी, तर १५ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या पोलिसांनी एकूण २० लाख रुपयांची लाच मागितली आहे.
लाचखोरीत नाशिक ‘हुशार’, मुंबई ‘ढ’
एसीबीचे राज्यात आठ विभाग आहेत. या सर्व विभागांत मिळून ४ ऑगस्टपर्यंत एकूण ४३१ सापळे रचण्यात आले. त्यातील मुंबईतील सापळ्यांची संख्या २६ इतकी आहे. सर्वाधिक ८१ कारवाया नाशिक विभागात झाल्या. त्याखालोखाल पुण्यात ७६, छत्रपती संभाजीनगर ७०, ठाणे ५६, अमरावतीत ४५ कारवाया झाल्या आहेत.
एसीबी नक्की कारवाई करेल, हा विश्वास लोकांमध्ये वारंवार निर्माण करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी राजकीय नेते, न्याय यंत्रणा व एसीबी अधिकाऱ्यांना पार पाडावी लागेल.
- प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.