थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

पेणमध्ये जागतिक आदिवासीदिन उत्साहात साजरा
पेण, ता. १० (वार्ताहर) : केंद्रासह राज्यातील सरकारच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या योजना मिळतात का, हे आपल्या कार्यकर्त्यांनी पाहणे गरजेचे असून आदिवासी समाज भवनासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण येथे केले. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासीदिनानिमित्त गणपती वाडी येथील हॉटेल सौभाग्य इन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवी पाटील, आदिवासी नेते कमलाकर काष्टे, आदीम कातकरी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष, विश्वास वाघ, आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष जोमा दरवडा, जिल्हाध्यक्ष हरेश वीर, लक्ष्मण निरगुडा, सचिव जनार्दन भस्मा, भाजप जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, दिनेश खैरे आदीसह समाजातील हजारो नागरिक उपस्थित होते. तर समाजाला असणाऱ्या आरक्षणानुसार नोकर भरती होत नसून ती तातडीने व्हावी, तसेच पेण तालुक्याच्या आदिवासी समाजातील काही मंडळी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शहरात भाजीपाला व्यवसाय करतात; परंतु नगरपालिकेचे कर्मचारी त्यांना बसू देत नाहीत. त्यामुळे त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आदिवासी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास वाघ यांनी आमदार रवी पाटील यांच्याकडे केली आहे. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी समाजाची परंपरा जोपासत मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी करण्यात आले.
.............
रोहा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक
रोहा (बातमीदार) ः आगामी सण-उत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी शांतता समिती बैठकीत केले. रोहा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ९) झालेल्या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, महेश कोलटकर, अध्यक्ष रमेश साळवी, माजी नगराध्यक्ष लालता कुशवाह यांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी सणांना गालबोट लागणार नाही, यासाठी परस्पर सहकार्याचे आश्वासन दिले.
................
सैनिकांसाठी राखी; श्रमिक विद्यालयाचा सहभाग
रोहा (बातमीदार) ः ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमात श्रमिक विद्यालय, चिल्हे येथील विद्यार्थ्यांनी २०० राख्या तयार करून देशभक्तीची भावना व्यक्त केली. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान रोहा गेली १० वर्षे हा उपक्रम राबवत असून, शाळांमधून सैनिकांसाठी राख्या बनवून पाठवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
................
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन
रोहा (बातमीदार) ः तळा तालुक्यातील महागावच्या वरदायिनी विद्यालयात शैक्षणिक साहित्यवाटप कार्यक्रमात बळीराजा फाउंडेशनचे सल्लागार राजेंद्र जाधव यांनी दानशूरांना दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. आदिवासी आणि ठाकूर समाजातील अनेक विद्यार्थी पाच-सहा किमी पायी प्रवास करतात; दहावीनंतर उच्च शिक्षणाच्या सुविधा नसल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते, अशी खंत या वेळी व्यक्त करण्यात आली.
...............
आंतरराष्ट्रीय मांजरदिन उत्साहात
खोपोली (बातमीदार) ः श्री कृपा एक्वेरियम व पेट केअर सेंटर येथे आंतरराष्ट्रीय मांजरदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. मांजरप्रेमींनी आपल्या पाळीव मांजरांसह सहभाग घेतला. पशुवैद्यकांकडून आरोग्य व आहार मार्गदर्शन, मोफत फूड सॅम्पल्स व भेटवस्तूंचे वितरण झाले. मोठ्या प्रमाणावर कॅट शो आयोजित करण्याची मागणीही मांजरप्रेमींनी केली.
...........
पेणमध्ये आर्थिक समावेशन मेळावा
अलिबाग ः जनधन खातेदारांसाठी री-केवायसी आणि प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी सुलभ करण्यासाठी सोमवारी (ता. ११) चिंचपाडा, पेण येथे विशेष मेळावा होणार आहे. रिझर्व्ह बँक आणि विविध बँक अधिकारी उपस्थित राहणार असून, खाते उघडणे, केवायसी अद्ययावत करणे, तसेच जीवनज्योती विमा, सुरक्षा विमा आणि अटल पेन्शन योजनेत नोंदणीची संधी उपलब्ध असेल.
..................
श्री कोटेश्वरी माता भक्तनिवास भूमिपूजन
मुरूड (बातमीदार) ः मुरूडच्या ग्रामदेवता श्री कोटेश्वरी माता भक्तनिवासाचे भूमिपूजन सोमवारी (ता. ११) सकाळी साडेनऊ वाजता आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक यांनी केले.
...............
पेणमध्ये रक्षाबंधन उत्साहात
पेण (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे झाले. बहिणींनी भावांना राखी बांधून दीर्घायुष्याची प्रार्थना केली, तर भावांनी आयुष्यभर रक्षणाचे वचन दिले. बाजारपेठेत महिलांची गर्दी, मंदिरांमध्ये भाविकांची रांग आणि सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमांनी सणाचे औचित्य वाढवले.
...............
पोलादपूर तहसील कार्यालयात लाभार्थी नोंदणी
पोलादपूर (बातमीदार) ः ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष ॲपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्राची मोफत नोंदणी पोलादपूर तहसील कार्यालयात सुरू झाली. तालुक्यातील २५० लाभार्थ्यांमध्ये वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थींचा समावेश आहे. अधिकारी गावागावात भेट देऊन नोंदणी पूर्ण करतील.
...................
पेण शहरात जागतिक आदिवासीदिन मिरवणूक
पेण (वार्ताहर) : जागतिक आदिवासीदिनानिमित्त पेणमध्ये हजारो आदिवासीबांधवांची मिरवणूक निघाली. खालूबाजा व पारंपरिक नृत्यांनी सजलेली ही मिरवणूक बाजार समितीपासून मार्गस्थ झाली. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.............
पोयनाड परिसरात रक्षाबंधन उत्सव
पोयनाड (वार्ताहर) : तालुक्यातील पोयनाड परिसरात शनिवारी (ता. ९) रक्षाबंधनाचा उत्साह दिसून आला. आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी सर्वच लाडक्या बहिणींनी विविध ठिकाणी मोठी गर्दी केली होती. शनिवारी सुट्टी असल्याने अनेक बहिणींनी शुक्रवारीच भावांकडे जाणे पसंत केले; मात्र मुंबई किंवा पुणे येथून अलिबागकडे येणाऱ्या बहिणींना पोयनाड आणि परिसरात काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रक्षाबंधन असल्याने पेढे, बर्फी, काजू कतली, गुलाबजाम या मिठाईला मोठी मागणी असल्याचे पोयनाड येथील मिठाई व्यापाऱ्यांनी सांगितले. सरकारने महिलांना एसटी प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे पोयनाड परिसरात मोठ्या संख्येने महिलांनी एसटी प्रवासाला पसंती दिली. अलिबाग येथून पनवेल, मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटीला महिलांचीच जास्त गर्दी दिसून आली. वातानुकूलित प्रवासासाठी लोकप्रिय असलेल्या ठाणे- अलिबाग- ठाणे या शिवाई प्रवासालादेखील अनेक महिलांनी पसंती दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com