कर्ज बुडवण्यासाठी चोरीचा बनाव
कर्ज बुडवण्यासाठी चोरीचा बनाव
शीतल मोरे, अंबरनाथ
पैशासाठी मनुष्य कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचेच एक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आले आहे. सोने तारण ठेवून कर्ज बुडवण्यासाठी एका महिलेने आपल्याच घरात साथीदाराच्या मदतीने चोरीचा बनाव केला. मात्र, त्याच दरम्यान दीर घरी आल्याने त्याच्या डोक्यावर हातोडीने आघात केला. बिंग फुटू नये, यासाठी महिलेने स्वतःच्या कपाळावर काचेच्या ग्लासने मारून जखमी केले. तर साथीदाराने सात लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार झाला. मात्र, पोलिसांच्या खाक्यापुढे चोरीचा हा बनाव अधिक काळ टिकू शकला नाही. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या १२ तासांत सीसीटीव्हीच्या साह्याने गुन्हेगाराला जेरबंद केले.
-----------------
अंबरनाथमध्ये काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि दरोड्यांच्या घटना वाढत असतानाच रविवारी दुपारी घडलेल्या एका घटनेने परिसर हादरला. सुरुवातीला ही घटना दिवसाढवळ्या घरफोडी व जीवघेण्या हल्ल्याची असल्याचे समजले; त्यामुळे नागरिकांमध्येही दहशत पसरली होती. मात्र, पोलिसांच्या तत्पर तपासातून उघड झाले की हा प्रकार खरा चोरीचा नव्हता, तर कर्जबाजारीपणातून रचलेला बनावट कट होता.
घराचा दरवाजा उघडा पाहून हेल्मेट आणि रेनकोट घातलेला एक चोरटा आत शिरला. कपाट फोडून त्याने साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. त्याचवेळी घरात अचानक आलेल्या मूकबधिर व्यक्तीने त्याला पाहिले. त्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने हातोड्याने त्याच्यावर हल्ला चढवला. गोंधळाचा आवाज ऐकून घरातील महिला खोलीबाहेर आली. चोरट्याला पाहताच तिने मूकबधिर दिराला वाचवण्यासाठी पुढे सरसावली; मात्र त्याने तिच्यावरही हल्ला चढवला आणि दागिने घेऊन फरार झाला. हातोड्याने डोक्यात प्रहार केल्याने महिलेचा दिर रक्तबंबाळ झाला होता.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारचे पाहायला आले. महिलाच घरातच होती, तर दिर बाहेर आला. रक्ताचा सडा पाहून या दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दुपारच्या सुमारास घडलेल्या या चित्तथरारक घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसही घटनास्थळी दाखल होऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तेथील परिस्थिती, महिलेच्या हालचालींवरून आणि तिच्या जबाबांवरून हा बनाव असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी शोधमोहीम अधिक वेगाने सुरू केली. दिवसाढवळ्या एक चोर घरात शिरून चोरी करून निघून जातो. घरात असणाऱ्या महिलेला समजत नाही हे कसे शक्य आहे? तसेच या चोरी मागचे उद्दिष्ट काय? असे प्रश्न पोलिसांना पडले. त्यांनी यंत्रणा कामाला लावली. त्यानुसार अनेक सीसीटीव्ही तपासले. यातील एका सीसीटीव्हीत महिलेने केलेल्या वर्णनानुसार चोरटा दिसला. त्याआधारे उल्हासनगर गुन्हे शाखा ४ ने चोरट्याचा पाठलाग करून त्याला पनवेल येथील आकुर्ली परिसरातून ताब्यात घेतले.
रविराज अभिमान कसबे (३७) याला अवघ्या १२ तासांत अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच कर्ज बुडवण्यासाठी चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. यामध्ये महिलाही सहभागी असल्याचे सांगितले. हा बनाव सोने तारण ठेवून कर्ज बुडवण्यासाठी केल्याचा खुलासा केला. मात्र, नेमका याचवेळी तिचा दिर आल्याने त्याच्यावर हल्ला केला. महिलेने संशय येऊ नये, यासाठी टेबलवरील काचेचा ग्लास डोक्यात मारून घेतला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने कामगिरी केल्याने चोरीचा बनाव समोर आला आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई
दुपारच्या शांत वातावरणात अंबरनाथमध्ये घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजवली. महिलेच्या साथीदाराने रचलेल्या बनावट चोरीच्या कटात अचानक आलेल्या दिरावर हातोड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि आरोपी तेथून पसार झाला. गंभीर जखमी दिराला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी संशयावरून व सीसीटीव्ही तपासून कटाचा अवघ्या बारा तासांत पर्दाफाश करत आरोपीला पनवेल येथून अटक केली. दिवसाढवळ्या रचलेल्या या थरारक कटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.