अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप
अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : राज्यातील शिवसेनेत पक्ष प्रवेशाची लाट अंबरनाथपर्यंत पोहोचली आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे कल्याण लोकसभेतील भव्य प्रवेश सोहळा शुक्रवारी पार पडला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली.
अंबरनाथ मनसेचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक व माजी सभापती कुणाल भोईर, जिल्हा संघटक व माजी नगरसेवक संदीप लकडे, शहर संघटक व माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर, विभाग अध्यक्ष चंद्रकांत चौघुले, महेश सावंत, प्रशांत भोईर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर अंबरनाथ शहरातील मनसेचे उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, पदाधिकारी आणि अनेक मनसैनिकही शिवबंधनात अडकले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या प्रभावी पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गट व मनसे युतीच्या चर्चांना रंग चढत असतानाच शिंदे गटाने मनसेला मोठा झटका दिल्याची चर्चा सुरू आहे. मनसेच्या जिल्हा संघटक, शहराध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम ठोकत, थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मनसेला मोठा धोबीपछाड दिल्याची चर्चा शहरात रंगली.
जे गेले त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. पक्षाने ज्यांना भरभरून दिले, मोठे केले, त्यांच्यावर राज ठाकरे, राजू पाटील, अविनाश जाधव यांनी प्रेम केले. अशा लोकांनीच गद्दारी केली. ते व्यापारी होते, व्यापार वाढवण्यासाठी गेले, विकासासाठी नाही.
- बंडू देशमुख, जिल्हाध्यक्ष, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.