सप्टेंबरमध्ये मेट्रोची चाचपणी

सप्टेंबरमध्ये मेट्रोची चाचपणी

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : अनेक वर्षांपासून मेट्रो प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या ठाणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ठाण्यातील मेट्रो मार्गिकेची चाचपणी सप्टेंबरला होणार असून डिसेंबरला प्रत्यक्ष मेट्रो धावणार असल्याची आनंद वार्ता खुद्द उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मेट्रोमुळे ठाण्यातील रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होऊन कोंडीतून दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत धावणारी मेट्रो ठाण्यात यावी, यासाठी काही वर्षांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. यामध्ये पहिवहनमंत्री प्रताप सरनाईक अग्रेसर होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे ठाण्यात मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. आधी ठाणे आणि नंतर या मेट्रोचे जाळे भाईंदरपर्यंत पसरवत खूप मोठा पल्ला पार पडणार आहे. या कामामध्ये अनेक अडथळे आले; पण सर्व स्पीडब्रेकर दूर करत मेट्रो प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रोसाठी डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली आहे; पण ठरलेल्या वेळेत मेट्रो धावणार की प्रतीक्षा वाढणार, याची धाकधूक वाढली होती. अखेर यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे.

रविवारी (ता. १०) झालेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गावर चाचणी फेरी सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात मेट्रोची सेवाही सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

सध्या ठाणेकर प्रचंड कोंडीचा सामना करत आहेत. मेट्रो सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरची रहदारी कमी होईल आणि कोंडीतून सुटका मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मेट्रोला जोडणाऱ्या अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. मेट्रोला अंतर्गत मेट्रोची जोड मिळाल्यास ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे ते म्हणाले.

कोंडीचा प्रश्न मार्गी लावणार!
ठाण्यातील कोंडी हादेखील विषय मार्गी लावत आहे. मेट्रोचाही निश्चित फायदा होईल. मुंबईपासून थेट ठाण्यापर्यंत कोस्टल रोड करत आहोत. ठाण्यातून खाडी साकेतमार्गे गायमुखवरून फाउंटन हॉटेलकडे जाणार आहे. तिथून थेट मिरा-भाईंदरजवळून अहमदाबाद महामार्गाला जोडले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील कोंडी बाहेरून जाणार आहे. हादेखील आपल्या ठाण्यासाठी मोठा प्रकल्प ठरेल, असे शिंदे म्हणाले.

असा असेल प्रवास...
- कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
- गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रोच्या चाचपण्या घेतल्या जाणार आहेत. आरडीओएसकडून मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. या तपासण्या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत.
- कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग २०२६ पर्यंत पूर्ण होईल.
- वडाळापर्यंतच्या प्रवासासाठी २०२७पर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती समोर आली आहे.

प्रकल्पाचा आढावा
मेट्रो- ४ ३२.३२ किमी
मेट्रो- ४ अ २.७ किमी
दोन्ही मार्गिकांवर ३२ स्थानके

काम पूर्ण
वडाळा ते कासारवडवली मार्ग ८५ टक्के
कासारवडवली ते गायमुख मार्ग ९० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com