थोडक्यात बातम्या नवी मुंबई
सीवूड्स येथे मंगळागौर स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
जुईनगर, ता. १० (बातमीदार) : सीवूड्स-करावेनगर विभागातील महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळागौर स्पर्धेचे जल्लोषपूर्ण आयोजन करण्यात आले. भाजपपुरस्कृत राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेला परिसरातील महिला संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी घंगाळे, तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. स्पर्धेत श्रावण सखी संघाने प्रथम क्रमांक पटकावत सात हजार रुपये रोख, चषक आणि सन्मानचिन्ह मिळवले. शिवदर्शन नवतारका संघाला पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक, तर गृहलक्ष्मी संघाला तीन हजार रुपये तृतीय पारितोषिक देण्यात आले. याशिवाय गुरुदत्त श्री ओंकार महिला मंडळ, कुसुमाग्रज समूह, राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांना प्रत्येकी १,५०० रुपये, चषक व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा लावणीसम्राट आशिमिक कामठे आणि अभिनेत्री आरती पानसरे यांनी परीक्षक म्हणून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमस्थळी भाजप आमदार मंदा म्हात्रे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, भाजप सीवूड्स मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव, माजी मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल, मीना निघोजकर, मंजू नायर, मीता गंगावणे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
..................
पामबीच उपमार्गावर गतिरोधकांची मागणी
जुईनगर (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १६, १८ आणि सहाला लागून असलेल्या पामबीच उपमार्गावर गतिरोधक नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहनांचा वेग जास्त असल्याने पादचाऱ्यांसह सायकलस्वारांना अपघाताची भीती वाटू लागली आहे. या मार्गालगत येत्या काही दिवसांत अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्यादेखील वाढली आहे; मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच येथे पालिकेमार्फत हरितपट्टा उभारण्यात आला असून त्या ठिकाणीदेखील निवांत वेळ घालवण्यासाठी काही नागरिक येत असतात. त्यांनीदेखील या मार्गावर गतिरोधकाची मागणी केली आहे. हा मार्ग बांधण्याआधी सेक्टर १६ आणि १८ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सीब्रिज आणि सागर दर्शन या गृहनिर्माण संस्थावगळता कुठेच गतिरोधक नाही. त्यामुळे या रस्त्याने वाहने अतिवेगाने धावत असतात. तर या रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. सायकल मार्गावर वाहने पार्क केल्याने सायकलस्वारदेखील नाराजी व्यक्त करत आहेत. या मार्गावरील दुतर्फा वाहनपार्किंग आणि पेट्रोल पंपाजवळील सीएनजी गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या रांगा येथील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
...........
बेलापूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर
तुर्भे (बातमीदार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर-नेरूळ शाखेतर्फे रविवारी (ता. २४) अग्रोलीतील ग्रंथालयात अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर होणार आहे. करणी, भूत, भानामती, चमत्कार यांसारख्या विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला जाईल व जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती दिली जाईल. नुकतेच बेलापूरमध्ये मांत्रिकाने लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी नागरिकांना सज्ञान करण्यासाठी हे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर भरविण्यात येत आहे. नागरिकांनी १५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन समितीने केले आहे.
............
स्पीडी मल्टिमोड्स कामगारांनी घेतले महेंद्र घरतांचे नेतृत्व
उरण (वार्ताहर) : जेएनपीएमधील स्पीडी मल्टीमोड्स सीएफएसमधील तब्बल ४५० कामगारांनी न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेत प्रवेश घेत महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. सात वेगवेगळ्या युनियनमध्ये विखुरलेल्या कामगारांनी अन्यायाला कंटाळून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच झालेल्या नामफलक अनावरण सोहळ्यात महेंद्र घरत, संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, विनोद म्हात्रे, संजय ठाकूर, मुरलीधर ठाकूर, सचिव लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, आदिनाथ भोईर, तसेच अनेक पदाधिकारी आणि शेकडो कामगार उपस्थित होते. महिला संघटकांमध्ये कल्पना ठाकूर, रेखा घरत, निर्मला पाटील, विनया पाटील यांचा सहभाग लक्षणीय होता.
............
टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियानाची बैठक
उरण (वार्ताहर) : उरण पंचायत समितीत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. पुढील चार महिन्यांत सर्व लक्ष्य पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीत टीबी जनजागृती, रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी मदत आणि सामाजिक-आर्थिक आधार देण्याबाबत चर्चा झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
..........
दहीहंडी उत्सवाबाबत पोलिस बैठक
उरण पोलिस ठाण्यात दहीहंडी उत्सव नियोजनाबाबत बैठक झाली. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी, परवानग्या, सुरक्षित स्टेज, ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन, रहदारी अडथळा टाळणे, विमा, प्रथमोपचार, ॲम्ब्युलन्स आदी बाबींवर सूचना देण्यात आल्या. तीन थरांपेक्षा वर मुलांना सहभागी न करण्याचा सल्ला देण्यात आला. बैठक एसीपी किशोर गायके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उरण पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच हद्दीतील पोलिस पाटील उपस्थित होते. या वेळी सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाचे पदाधिकारी व पोलिस पाटील यांना विशेष सूचना देण्यात आल्या. यामध्ये सर्व मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे दहीहंडी उत्सव मंडळाची नोंदणी करावी, जागा मालक नगर परिषद, ग्रामपंचायत व संबंधित जागा मालकांची परवानगी घ्यावी, तात्पुरते विद्युत जोडणी घ्यावी, दहीहंडीच्या ठिकाणी स्टेज मजबूत असावे, याबाबत तज्ज्ञ अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडून तपासणी करून घ्यावी. दहीहंडीचे थर कमीत कमी लावण्यात यावे. ध्वनिप्रदूषणसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कार्यक्रमादरम्यान रहदारीस अडथळा किंवा नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.