पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी नवी मुंबईकरांना आवाहन
पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी नवी मुंबईकरांना आवाहन
नेरूळ, ता. १० (बातमीदार) ः यावर्षी २७ ऑगस्टपासून सुरू होणारा श्रीगणेशोत्सव प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करत नैसर्गिक पंचतत्त्वांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला आहे.
आयुक्तांनी सांगितले की, मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी शाडू मातीचा वापर करावा, तर पीओपी, प्लॅस्टिक, सिमेंट व विषारी रंग टाळावेत. थर्मोकोल व प्लॅस्टिकच्या सजावटीऐवजी कागद, पुठ्ठा आणि कपड्यांच्या साहित्याचा वापर करावा. महापालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील कपडा पुनर्वापर प्रकल्पातून तयार केलेली आकर्षक सजावटीची सामग्री नागरिकांसाठी मुख्यालय व आठही विभागीय कार्यालयांतील स्टॉलवर उपलब्ध आहे.
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी निवासी भागात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ५५ डेसिबल व रात्री १० ते मध्यरात्रीपर्यंत ४५ डेसिबल मर्यादा पाळावी. मध्यरात्रीनंतर लाऊडस्पीकरचा वापर पूर्णतः बंद आहे. जलप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने सर्व विभागांमध्ये कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. सहा फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जनजागृती मोहिमेत स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
....................
ग्रीन फेस्टिव्हलचे उद्दिष्ट
महापालिका ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ व ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान’अंतर्गत प्लॅस्टिकमुक्त, थर्मोकोलमुक्त, प्रदूषणमुक्त आणि फटाकेमुक्त ‘ग्रीन फेस्टिव्हल’ साजरा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर वाढवावा आणि फटाके टाळावेत, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव हा प्रदूषणाचे विघ्न दूर करणारा आणि भावी पिढ्यांसाठी निसर्गसंपन्न वारसा निर्माण करणारा ठरेल.