महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास अंधारातूनच
महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास अंधारातूनच
पथदिवे, संरक्षक कठडे व सुरक्षिततेच्या उपायांचा अभाव
पनवेल, ता. १० (बातमीदार) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अनेक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था नाही, संरक्षक कठडे लावलेले नाहीत आणि सुरू असलेल्या कामामुळे चिखलात वाहनांची चाके रुतण्याचा धोका कायम आहे. काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाला असला तरी अपूर्ण सुविधा व सुरक्षेच्या अभावामुळे प्रवाशांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी वारंवार दौरे केले. आमदारांनीही विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. तरीही पथदिव्यांची उणीव आणि रस्त्याच्या कडेला मातीमुळे पावसाळ्यात वाहनांची अडचण कायम आहे. अंधारामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अटल सेतूवरून पुण्यापर्यंतचा नव्या रस्त्याचा आराखडा जाहीर केला असला, तरी गेल्या १२ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. कोकणवासीयांनी अनेक आंदोलने केली, परंतु पळस्पे उड्डाणपुलावरील आणि पुलाखालील खड्ड्यांची समस्या कायम आहे. मंत्री येण्याआधी तात्पुरत्या डागडुजीचा ‘मुलामा’ देण्याची पद्धत वर्षानुवर्षे सुरू आहे.
..............
चाकरमान्यांच्या प्रवासाला प्रारंभीच गालबोट
पळस्पे फाटा, जो कोकणात जाणाऱ्या प्रवासाचा मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथेच वाहतूक कोंडी, चिखल, उखडलेले पेव्हर ब्लॉक आणि नाल्याचे पाणी वाहतुकीत अडथळा ठरत आहेत. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो वाहनांना प्रवासाच्या सुरुवातीलाच त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
.................
उद्योगमंत्र्यांचे आश्वासन
महामार्गावरील अंधाऱ्या ठिकाणी पथदिवे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. धोकादायक ठिकाणी सूचनाफलक लावले जातील, पोलिस मदतकक्ष सुरू राहतील आणि स्थानिकांशी संवाद ठेवून चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.