एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा विनयभंग
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : शाळकरी मुलगी परीक्षेचा पेपर देण्यासाठी शाळेत जात असताना तिच्या शेजारील गावात राहणाऱ्या तरुणाने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाहेर भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर राजाराम शेदड (वय ३५) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारी १५ वर्षीय पीडित मुलगी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चाचणी परीक्षेचा पेपर देण्यासाठी शाळेत जाण्यासाठी रिक्षाने जात होता. या वेळी किशोरने रिक्षाचा पाठलाग करून मुलगी साडेसहा वाजता रिक्षातून उतरली असता शाळेच्या बाहेरील मुख्य रस्त्यावरच एकतर्फी प्रेमातून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ तालुका पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात किशोरविरोधात पोक्सो कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.