भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात दुहेरी भर

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात दुहेरी भर

Published on

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात दुहेरी भर
‘उदयगिरी’, ‘हिमगिरी’चे २६ ऑगस्टला जलावतरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लवकरच दुहेरी भर पडणार आहे. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी दोन अत्याधुनिक युद्धनौका (स्टिल फ्रिगेट्स)  ‘उदयगिरी’ (एफ ३५) आणि ‘हिमगिरी’ (एफ ३४) नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. २६ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम् येथे होणाऱ्या सोहळ्यात प्रथमच दोन मोठ्या युद्धनौकांचे जलावतरण करण्यात येणार आहे.
‘उदयगिरी’ ही प्रोजेक्ट १७ ए मालिकेतील दुसरी युद्धनौका असून, तिची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने केली आहे. ‘हिमगिरी’ ही कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सची पहिली पी१७ए युद्धनौका आहे. विशेष म्हणजे ‘उदयगिरी’ ही नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने डिझाइन केलेली शंभरावी नौका आहे. सुमारे ६,७०० टन वजनाच्या या युद्धनौका पूर्वीच्या शिवालिक वर्गापेक्षा पाच टक्के मोठ्या आहेत. कमी रडार दृश्यता, स्लीक रचना, अत्याधुनिक नेव्हिगेशन, फायर फायटिंग, डॅमेज कंट्रोल आणि कम्युनिकेशन प्रणाली ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कोडॉग प्रणालीनुसार डिझेल इंजिन व गॅस टर्बाइनद्वारे जहाजांना वेग दिला जातो. शस्त्रसाठ्यात सुपरसॉनिक सरफेस-टू-सरफेस मिसाइल्स, मध्यम पल्ल्याचे हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, ७६ मिमी एमआर गन, ३० मिमी व १२.७ मिमी क्लोज-इन वेपन सिस्टिम्स तसेच अत्याधुनिक पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रांचा समावेश आहे.
---
२०० हून अधिक उद्योगांचा सहभाग
दोन युद्धनौकांच्या निर्मितीत देशातील २०० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा सहभाग आहे. त्यामुळे सुमारे चार हजारांना प्रत्यक्ष आणि १० हजारांहून अधिक जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे जिवंत उदाहरण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
----
नौदलाची उंच भरारी
यंदा नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’, ‘आयएनएस वाघशीर’, ‘आयएनएस अर्नाळा’ आणि ‘आयएनएस निस्तार’ यांचा समावेश झाला आहे. आता ‘उदयगिरी’ व ‘हिमगिरी’मुळे भारतीय महासागरातील पहारा आणखी मजबूत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com