बदलापुरच्या प्रभाग रचनेत घोटाळा?
बदलापूर, ता. १० (बातमीदार) : आगामी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचनेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. या संदर्भातील तक्रारपत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांना दिले आहे. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभागरचना रद्द करून, आपल्या नियोजनाखाली नवीन प्रभागरचना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी काही इच्छुक उमेदवार, ठरावीक पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या फायद्यासाठी प्रभागरचना केली आहे, असे कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. नदी, नाले, राज्य महामार्ग, रेल्वे आदींबाबत स्पष्ट नियमावली अस्तित्वात असतानाही ती धाब्यावर बसवण्यात असल्याचे म्हटले आहे.
१५ ते १६ प्रभागांमध्ये नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असणाऱ्या प्रभागांचे आराखडे ठरावीक उमेदवारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदार कथोरे यांनी केली आहे.
संघर्षाची कहाणी
बदलापूर शहरात अगदी लोकसभा निवडणुकीपासूनच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढला आहे. भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख म्हात्रे यांच्यात शीतयुद्ध सुरूच होते, त्यातच विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष टोकाला गेला होता. या काळात विरोधकांना धमकावण्यासाठी गुंडांची मदत घेतल्याचाही आरोप झाला होता. विधानसभा निकालानंतरही संघर्ष वाढत गेला. त्यानंतर एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रकार सुरूच राहिले. पालिका निवडणुकीत हा महायुतीतील घटकपक्षांचा संघर्ष वाढण्याची शक्यता असताना त्यात प्रभागरचनेच्या प्रकरणाची भर पडली आहे.
प्रभागरचना ही शासकीय मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आलेली आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप केलेला नाही.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, बदलापूर पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.