थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

रोह्यातील दहीहंडी उत्सवात लाखोंचे बक्षीस
रोहा (बातमीदार) ः खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रोह्यातील पारंपरिक दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यात मुख्य दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २ लाख २२ हजार २२२ रुपये आणि मानाचा गदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय इतर सहभागी पथकांसाठीही लाखो रुपयांची बक्षीसे जाहीर केली असून, गोविंदा पथक, महिला पथक आणि बाळ गोपालांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. सात थर लावणाऱ्या पुरुष पथकांना प्रत्येकी ३३,३३३ रुपये, तर ६ थर लावणाऱ्या पथकांना ११,१११ रुपये आणि आकर्षक गदा स्मृतिचिन्ह दिले जाईल. महिला गोविंदा पथकांपैकी ५ थर लावणाऱ्यांना ९,९९९ रुपये आणि ४ थर लावणाऱ्यांना ७,७७७ रुपयांची बक्षीसे मिळणार आहेत. कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, वरदा सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हिंदी, मराठी, कोळीगीत आणि देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
.................
आदर्श शिक्षिका सुमित्रा घाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पेण (बातमीदार) ः तालुक्यातील आदर्श शिक्षिका व आदर्श मुख्याध्यापिका सुमित्रा कमलाकर घाटे (वय ८७) यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभेला माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, समाजातील मान्यवर व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी वाचनालय व ग्रंथालयात करण्यात आले होते. ॲड. प्रसाद पाटील, खासदार धैर्यशील पाटील, अरविंद वनगे, घाटे यांच्या कन्या ऋता व मुक्ता, तसेच सुधीर जोशी, विनायक गोखले यांसारख्या मान्यवरांसह विद्यार्थी वर्ग, शिक्षकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय संस्थेच्या उपाध्यक्षा सपना पाटील आणि कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
घाटे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे योगदान देत विद्यार्थ्यांच्या जीवनात उज्ज्वल बदल घडवून आणला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
................
विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनात साजरा केला रक्षाबंधन
मुरूड (बातमीदार) ः तालुक्यातील साळाव येथील जिंदाल विद्या मंदिराच्या चार विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरे करण्याची संधी मिळाली. हा क्षण शाळेच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा ठरला असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खनक ओसवाल, उमर करणी, अद्रिता चक्रवर्ती आणि प्रीती लाटे यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शाळेचे प्राचार्य मुकेश ठाकूर आणि जेईटी प्रमुख डॉ. भावेश भालेराव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना राखी बांधून विश्वास, संरक्षण आणि प्रेमाचा संदेश दिला. राष्ट्रपतींनी त्यांच्याशी संवाद साधत कौतुक केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामागे प्राचार्य ठाकूर यांचे नियोजन, दूरदृष्टी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा प्रयत्न महत्त्वाचा असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मलिक यांनी सांगितले.
...............
गौळवाडी विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा
कर्जत (बातमीदार) ः स्वातंत्र्य दिनानिमित्त गौळवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत चित्रकला, रांगोळी आणि तिरंगी राखी बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ७ व ९ जुलै रोजी चित्रकला व रांगोळी स्पर्धेत ‘ध्वजारोहण’ विषयावर सुंदर कलाकृती साकारल्या. वृक्ष रक्षाबंधन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तिरंगी राख्या बनवून झाडांना बांधल्या व पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमास पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सायली पंदेरे यांनी वृक्ष रक्षाबंधनावर कविता सादर केली, तर मुख्याध्यापक अनिल गलगले यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमांचे सर्व स्तरावर कौतुक झाले.
..........................
कोमसाप श्रीवर्धन शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर
श्रीवर्धन (वार्ताहर) ः कोकण मराठी साहित्य परिषद, श्रीवर्धन शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया सार्वजनिक वाचनालय येथे पार पडली. सीमा रिसबूड यांची अध्यक्षपदी पुनर्निवड झाली, तर उपाध्यक्षपदी प्रसाद जोशी यांची निवड झाली आहे. सचिव नंदकुमार चितळे, जिल्हा प्रतिनिधी प्रविता माने, युवा प्रतिनिधी पद्मजा कुळकर्णी, खजिनदार अनिता कांबळे, सल्लागार रोहिणी क्षीरसागर अशी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. सदस्यपदी आनंद जोशी, शर्मिला जोशी, अनघा चोगले, मनोज गुरव, एकनाथ कोसबे, उमेश आमले आणि सुनिल यादव यांची निवड झाली. निवड प्रक्रियेत नरेश अप्पा बोरकर यांनी सूचक तर सुभाष कोल्हटकर यांनी अनुमोदन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना पद्मजा कुळकर्णी यांनी केली.
................
पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फीडर कामाचा आढावा
कर्जत (वार्ताहर) ः वंजारवाडी व दहिवली येथील स्टेशनवर वीज खंडित झाल्यास कर्जत शहरात पाणीपुरवठा ठप्प होतो. ही समस्या दूर करण्यासाठी वीज ग्राहक समितीच्या मागणीनुसार एक्सप्रेस फीडरचे काम सुरू आहे. समितीने या कामाचा आढावा घेऊन ते येत्या महिन्यात पूर्ण व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी महावितरणला निवेदनाद्वारे करण्यात आली. स्मार्ट मीटर नागरिकांच्या परवानगीशिवाय बसविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ॲड. कैलास मोरे यांनी दिला. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ तास अखंड वीजपुरवठा व्हावा, प्रलंबित समस्या सोडवाव्यात, बिल वेळेवर द्यावे, तक्रारींवर त्वरित कारवाई व्हावी, अशा मागण्या समितीने मांडल्या. महावितरण अधिकाऱ्यांनी गणपतीत अखंड वीज पुरवठ्याची हमी दिली.
..................
श्रेयस पराडकरचे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश
रोहा (बातमीदार) ः श्रेयस वृषाली दीपक पराडकरने राष्ट्रीय जलतरण स्पेशल ऑलिम्पिक भारत २०२५ मध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकत उत्तुंग यश मिळवले आहे. कांदिवली, मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत २२ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
श्रेयसने ५० मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदक आणि १०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावले. याआधी पुण्यातील राज्यस्तरीय पात्रता स्पर्धेत त्याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला होता. १४-१७ वयोगटात स्पर्धा खेळणाऱ्या श्रेयसच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक भुषण शिर्के यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com