कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

पायवाटा आणि गटार कामांचे भूमिपूजन
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील ग्रामीण अ प्रभागातील प्रभाग क्रमांक ११, बल्याणी प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सक्रिय पाठपुरावा केला असून, प्रभागाच्या कायापालटासाठी मोठा प्रयत्न करून एक कोटी ४५ लाखांचा निधी मिळवण्यात यश मिळवले आहे. या निधीअंतर्गत बल्याणी प्रभागातील विविध ठिकाणी सीसी रस्ते, पायवाटा आणि गटारे बांधणीची कामे सुरू होतील. या विकासकामांचे भूमिपूजन कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते नुकतेच झाले. उंभर्णी गाव येथे अंतर्गत गटार आणि पायवाटा बांधणीसाठी २० लाख रुपये, बल्याणी येथील कशिम गुजर यांच्या ऑफिस ते एजीआर स्कूलपर्यंत सीसी रस्ता बांधणीसाठी ५० लाख रुपये, बल्याणी नाका येथील मस्जिद परिसरात सीसी रस्ता आणि गटारे बांधणीसाठी २५ लाख रुपये, सावळाराम पाटील नगर येथील मेन रोड ते चक्की नाका सीसी रस्ता बांधणीसाठी ५० लाख रुपये इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील, माजी शिक्षण सभापती व माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या पाठपुराव्यालाही हे यश लाभले असून, या प्रभागातील नागरिकांना या मूलभूत पायाभूत सुविधांचा मोठा फायदा होणार आहे. बल्याणी प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असूनही, आमदार आणि महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागत आहेत, असे मयूर पाटील यांनी सांगितले. प्रभागाच्या विकासासाठी पालिका प्रशासन आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून, प्रभागाचा कायापालट करण्याचा हा त्यांचा ठाम संकल्प आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
...................
बंजारा समाजाचा ‘तिज’ महोत्सव उत्साहात
टिटवाळा (वार्ताहर) : बंजारा समाजाच्या पारंपरिक तिज महोत्सवाला टिटवाळ्यात भरघोस प्रतिसाद मिळाला. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि समस्त गोर बंजारा समाज, कल्याण ग्रामीण व टिटवाळा परिसराच्या वतीने आयोजित हा महोत्सव टिटवाळा येथील श्री गणपती मंदिर धर्मशाळेत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात पार पडला. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे बंजारा समाजाची संस्कृती, लोकजीवन, निसर्गावरील प्रेम, धार्मिकता आणि मानवी भावना यांचे सजीव दर्शन घडवण्यात आले. तिज महोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्य सादर करून उपस्थितांना समृद्ध सांस्कृतिक अनुभव देण्यात आला. कार्यक्रमास भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महिलांनी पारंपरिक बंजारा नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात समाजाच्या एकोप्याचे दर्शन घडले असून, लोकप्रबोधन, लोकरंजन, आणि सुसंस्कारांची पेरणी करणारा हा महोत्सव समाजाला प्रेरणादायी ठरला.
................
‘ऑपरेशन सिंदूर’वर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान
डोंबिवली : चतुरंग प्रतिष्ठानने नुकतेच आपल्या कार्याच्या ५१ व्या वर्षात यशस्वी प्रवेश केला असून, डोंबिवली शाखेचेही ३९ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्धापनदिनानिमित्त ‘मुक्त संध्या’ या उपक्रमांतर्गत माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान गुरुवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजता, सुयोग मंगल कार्यालय, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी चतुरंग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com