प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप

Published on

भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आहेत. त्यासाठी नव्याने प्रभाग रचना बनविण्यात येत आहेत. ठाणे जिल्हा परिषदअंतर्गत भिवंडी तालुक्यातील प्रभाग रचना बनविताना निवडणूक आयोगाच्या आदर्श प्रभाग रचनेच्या सूचनांना भंग करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार ॲड. सुजित भोईर व शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे.

सरकारी निर्णयानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रभाग रचना निश्चित करावयाची होती. त्यामध्ये भौगोलिक कारणांमुळे दहा टक्के कमाल आणि किमान वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भिवंडी ग्रामीणची जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकसंख्या चार लाख ३१ हजार ७२१ एवढी आहे. गणांची निर्मिती करताना २१ जिल्हा परिषदेसाठी २० हजार ५५८, तर ४२ पंचायत समितीसाठी १० हजार २७९ ही लोकसंख्या प्रमाण मानण्यात आली आहे. असे असताना भिवंडी तालुक्यात गट व गणांची प्रभाग रचना करताना राजनोली गटाची निर्मिती केली. ज्याची लोकसंख्या २५ हजार ५७५ आहे. त्यामधील पंचायत समिती राजनोली व गोवे यांच्या गणांची लोकसंख्या अनुक्रमे १२ हजार २४० आणि १३ हजार ३३५ अशी आहे. नजीकच्या अंजूर जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या १० टक्के किमानपेक्षा कमी ठेवली आहे, असा आरोप ॲड. सुजित भोईर यांनी केला आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पिंपळघर गाव अंजूर गटात होता; परंतु या निवडणुकीत तो राजनोली गटात समाविष्ट केला आहे. या निर्णयामुळे सलगता नसलेल्या गावाचा समावेश राजनोली गटात केल्याचा आरोप तक्रारीत जिल्हाधिकारी व कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आला आहे. याशिवाय भाजपचे मंडळ अध्यक्ष नीलेश गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, भाजपचे बाळकृष्ण ठाकरे यांनीही तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेबाबत हरकत नोंदवली आहे. प्रभाग रचनेबाबत तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही.


पिंपळासचा अंजूर गटात समावेश करा!
राजनोली गणात पिंपळघर, सरवली गावांचा समावेश आहे. तर गोवे गणात पिंपळास, पिंपळघर, गोवे गावांचा समावेश आहे. अंजूर गणात दिवे, अंजूर, भरोडी, आलीमघर या गावांचा समावेश आहे. वेहळे गणात सुरई सारंग, वेहळे, पिंपळनेर, पिंपळघर यांचा समावेश करण्यात आला आहे. अंजूर व वेहळे गणांची लोकसंख्या अनुक्रमे १० हजार ४२१ आणि आठ हजार ०४९ आहे, ज्यामुळे अंजूर गटाची एकूण लोकसंख्या १८ हजार ४७० झाली आहे. तक्रारीत पिंपळास गावाचा अंजूर गटात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत अनेक त्रुटी आढळून येत असून, राजनोली गटाची लोकसंख्या कमाल लोकसंख्येपेक्षा २४ टक्के अधिक, तर अंजूर गटाची लोकसंख्या किमान लोकसंख्येपेक्षा १२ टक्के कमी आहे. त्यामुळे पिंपळास गाव अंजूर गटात समाविष्ट केल्यास समतोल राखला जाईल, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

न्यायालयाच दरवाजे ठोठावणार
कोकण विभागीय आयुक्तांनी योग्य न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी असल्याचे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com