मातीला आकार, रंगाचा साज
वसई, ता. ११ (बातमीदार) : येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यापूर्वी श्रीगणेशाची मूर्ती तयार करण्याच्या कामाला कारखान्यात वेग येऊ लागला आहे. आकर्षक, देखणी मूर्ती आणि सुबक असावी, यासाठी मूर्तिकार मेहनत घेत आहेत. या कामाला हातभार लावण्यासाठी तरुणी आणि महिला पुढे येत आहेत. कलेची आवड जपत कुटुंबाला आर्थिक हातभारही लावत आहेत. वसईत राहणाऱ्या कुटुंबातील गृहिणी, दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी बाप्पाची मूर्ती घडविण्यात रममाण झाल्या आहेत.
लाडक्या बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. संकटमोचन, विघ्नहर्त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये नवचैतन्य पसरते. पालघर जिल्ह्यात घरगुती आणि सार्वजनिक मंडळात मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या अगोदर मूर्ती तयार करण्याचे काम दोन ते तीन महिने अगोदर सुरू केले जात होते. सध्या हे काम सुरू अंतिम टप्प्यात आले आहे. भाविक आपल्या पसंतीची मागणी करू लागले असून बुकिंग घेतले जात आहे.
वसई पश्चिमेतील मूर्तिकार हेमंत पाटील हे पापडी येथे गणेशमूर्ती घडवण्यात मग्न झाले आहेत. त्यांना त्यांची पत्नी पल्लवी पाटील आणि बारावीत शिकणाऱ्या प्रचिती व प्रतीक्षा या दोन मुलीही मदत करत आहेत. माती मळून साच्यात टाकणे, बाप्पांची सोंड तयार करणे, आकर्षक डोळे, सुपाएवढे कान तयार करणे; पोटाचा आकार काढणे, सुंदर मुकुट तयार करणे, रंगकामासह अन्य कामे त्या करत आहेत. त्यांच्याकडे महादेव, जय मल्हार, स्वामी समर्थ यांसह विविध आध्यात्मिकतेवर मूर्ती बुकिंग करण्यात आल्या आहेत. या मूर्ती केंद्रातून वसई, विरार, नाळे, नालासोपारा यांसह अन्य भागांत नेल्या जातात. कुटुंबातील सर्व जण मूर्ती तयार करण्याचे काम करत असल्याने मेहनतीची जोड आणि त्यातून आकारात येणारी मूर्ती नजरेला भावत आहे.
--------
ज्या मुलींना, महिलांना कलेची आवड आहे, त्यांनी मूर्ती तयार करण्याचे काम करावे. जेणेकरून आपली कला जोपासताना व्यवसायही उपलब्ध होईल. आमच्या मूर्तिकेंद्रात माझ्या दोन्ही मुली आवडीने काम करत आहेत. त्यामुळे कामगाराची आवश्यकता भासत नाही. वेळेचा सदुपयोग होतो आणि कुटुंबाला हातभार लागतो.
- पल्लवी पाटील, मूर्तिकार, पापडी
--------
माती व वाहतूक रंग महाग
शाडूची माती वापरून मूर्ती घडवली जात आहे, त्यासाठी पेण येथून माती वसईत आणली जात आहे. ५० किलोमागे ५०० रुपये इतका खर्च येत असतो. गेल्या वर्षीपेक्षा १०० रुपये अधिक मोजावे लागत आहे. नैसर्गिक रंगाचा वापर केला जात असल्याने एका डबीमागे ५० रुपये वाढ झाली आहे, असे मूर्तिकार हेमंत पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.