नाल्यात प्रक्रियेविना २० टन धोकादायक रसायने
धोकादायक रसायनांची नाल्यात विल्हेवाट
भिवंडीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात, आरोपींवर गुन्हे दाखल
भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : ठाणे खंडणीविरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी भिवंडीमध्ये केलेल्या खळबळजनक कारवाईत पर्यावरणाचा नाश करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने दररोज २० टनांहून अधिक धोकादायक रसायने नगरपालिकेच्या हद्दीतील नाल्यात प्रक्रियेविना टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान धोक्यात आले होते. नारपोली पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाचहून अधिक आरोपींविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा व धोकादायक रसायने नियंत्रण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारी (ता. १०) गुप्त माहितीच्या आधारे मावजी कंपाउंड, नारपोली येथील श्रीकर डाईंग समोर असलेल्या डंपिंग ग्राउंडजवळ छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणावर टँकर, यंत्रसामग्री आणि रसायने आढळून आली.
जप्त केलेल्या टँकरमधील रसायन हे कॅल्शियम हायपो क्लोराईट सोल्यूशन (ब्लीच लिक्विड) असल्याचे निष्पन्न झाले असून, हे अत्यंत ज्वलनशील आणि विषारी आहे. पाण्यात मिसळताच या रसायनामुळे विषारी वायू निर्माण होऊन वातावरणात पसरत होता. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वस्थता जाणवत होती. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या टँकर, यंत्रसामग्री व रसायनांची एकूण किंमत १० लाख ७२ हजार रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याशिवाय रसायनांची वाहतूक लपवण्यासाठी वापरलेल्या डिझेल पावत्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात मनोज कुमार हृदय नारायण भारती (वय ४२), छोटे मोहम्मद शफीक अहमद मन्सूरी (वय ४०), सिद्धू नारायण काटे, अझीझ अहमद आणि दोडिया केमिकल्स टॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या आरोपींविरोधात संपत्ती नाश, पर्यावरणाचा घात आणि जनजीवन संकटात आणल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस आता या बेकायदा धंद्याच्या मूळ स्त्रोतांचा शोध घेत आहेत म्हणजेच हे रसायन कुठून आणले जात होते, ते नाल्यात का टाकले जात होते आणि या व्यवहारामागे कोणते मोठे हात आहेत, याचा तपास सुरु आहे. लवकरच वाहतूक, साठवणूक आणि मालकी हक्काशी संबंधित इतर आरोपींवरही कारवाई करण्यात येणार आहे.
रसायन साखळी
सूत्रांच्या माहितीनुसार, वाडा येथील एका रासायनिक कंपनीकडून हे रसायन अंबरनाथ येथील एका कंपनीला शुद्धीकरणासाठी पाठवले जात होते. मात्र, काही राजकारणी आणि स्थानिक दलालांच्या संगनमताने हे रसायन थेट भिवंडीतील नाल्यांमध्ये टाकले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा बेकायदा प्रकार सुरु असल्याची माहिती असून, यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. मात्र, यावेळी पोलिसांनी प्रथमच सुसूत्र सापळा रचून ही रासायनिक टोळी उध्वस्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.