थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव
मुरूड, ता. ११ (बातमीदार) ः मुरूड येथील जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच सदस्यांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. चेअरमन दिलीप जोशी व संचालक मंडळाच्या हस्ते गुणवंतांना प्रशस्तीपत्रे आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. गौरव प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये स्वरा राऊळ, अश्मल किल्लेदार, विया जैन, रागिणी पावशे, उर्वशी कोवळेकर, अंतरा नाक्ती, श्रुती म्हात्रे, महेक शर्मा, नियती पाटील, अनिह जोशी, वेदिका खोत, तनिष मुंबईकर, जयवंत रोटकर, स्वरांग खोत, अक्षरा शेळके, मुग्धा नांदगावकर, प्रिती म्हात्रे, सानिया भोईर आणि निष्णाई तळेकर आदींचा समावेश होता. सभेत प्रा. एस. बी. वाटाणे यांनी ‘सभासदांचे हक्क व कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रत्येक सदस्याने किमान एक हजार रुपयांचे भाग खरेदी करावेत तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ सदस्य जनार्दन गायकर यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन झाले.
.................
रोह्यात महिला गोविंदा पथकांचा सन्मान
रोहा (बातमीदार) ः रोहे अष्टमी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांच्या वतीने यंदाही शहरातील विविध गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे. शहरातील प्रत्येक आळीला निमंत्रण देण्यात आले असून या भव्य उत्सवात खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुख्य बाजारपेठेतील रोहावाला हाइट्ससमोर आयोजित या दहीहंडी सोहळ्यात मोरे आळी, अंधार आळी, धनगर आळी या पारंपरिक पथकांना प्रत्येकी २१ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात येईल. महिला गोविंदा पथकांमध्ये मोरे आळी, अंधार आळी व धनगर आळी पथकांनी तीन थर लावल्यास त्यांना प्रत्येकी ३,३३३ रुपये रोख देण्यात येतील. या सर्व बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून, उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार होईल.
................
पेण नगरपालिकेत रांगोळी स्पर्धा उत्‍साहात
पेण (वार्ताहर) : नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत, माझी वसुंधरा आणि हर घर तिरंगा अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पालिका आवारात झालेल्या या स्पर्धेत महिलांसह अनेक मुलींनी उत्साहाने भाग घेतला. स्पर्धेत ‘सर्वधर्मसमभाव’, ‘शांतीचे प्रतीक’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या विषयांवर रांगोळ्या काढण्यात आल्या. मुख्याधिकारी जीवन पाटील, अधिकारी सुहास कांबळे, किरण शहा, दयानंद गावंड आणि उमंग कदम यांनी रांगोळ्यांची पाहणी करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.
..............
अलिबागमध्ये शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा
अलिबाग (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे महायुती सरकारमधील भ्रष्ट नेत्यांवर तातडीने कारवाईची मागणी करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. उपनेते बबन पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चादरम्यान पोलिसांचे बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास दीड तास चाललेल्या वादानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. स्थानिक समस्या आणि भ्रष्टाचाराविरोधातील मागण्या यात मांडण्यात आल्या. मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
..................
मनसे तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर तुर्डे
पोलादपूर (बातमीदार) : धारिवली गावातील रहिवासी ज्ञानेश्वर रमेश तुर्डे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. त्‍यांची पोलादपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन तुर्डे यांनी पक्षप्रवेश केला. या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर, शहराध्यक्ष अनिल खेडेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तुर्डे यांनी तरुणांना दिशा देणे आणि समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवणे हे आपले ध्येय असल्याचे सांगितले.
..................
तांबाटी येथे सुसज्ज अंगणवाडीचे उद्‌घाटन
खोपोली (बातमीदार) ः तालुक्यातील तांबाटी येथे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सीएसआर निधीतून उभारलेल्या सुसज्ज अंगणवाडीचे उद्‌घाटन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते झाले.
या अंगणवाडीच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी मुलांना शैक्षणिक व खेळण्यांच्या सुविधा मिळणार आहे. दरवर्षी सुमारे पाच मुले, ३० गरोदर महिला, ५० स्तनपान करणाऱ्या माता आणि १०० कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर उपस्थित होते.
.................
सोगाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
अलिबाग : जागतिक आदिवासी दिनानिमित्त सोगाव व चोरोंडे आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी प्लॅस्टिक चटया व जातीचे प्रमाणपत्र वाटप केले. सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी हे गेली अनेक वर्षे आपल्या भागातील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना व विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहेत. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक उपाध्यक्ष लाईक कप्तान तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com