कल्याण अवती-भवती
संत निरंकारी मिशनद्वारे कल्याणमध्ये रक्तदान शिबिर
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली विभागाअंतर्गत कल्याण शाखेच्या वतीने रविवारी (ता. १०) नूतन विद्यालय कल्याण पूर्व येथे रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात तब्बल १५८ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. यात १३२ पुरुष तर २६ महिलांनी रक्तदान केले. या शिबिरातील रक्तसंकलन संकल्प रक्तपेढी, कल्याण व संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या मानवतेची शिकवण या वेळी निरंकारी भक्तगणांनी प्रदर्शित केली. रक्तदान शिबिराची सुरुवात संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांनी निरंकार ईश्वराच्या प्रति प्रार्थना करीत सतगुरूंच्या जयघोषाद्वारे केली. या वेळी निरंकारी मिशनचे सेवादल स्वयंसेवक तसेच कल्याणसह आजूबाजूच्या परिसरातील निरंकारी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराला शहरातील अनेक नामांकित मान्यवर उपस्थित राहिले आणि त्यांनी संत निरंकारी मिशन निरंतर मानवतेप्रति करीत असलेल्या कार्याचे कौतुकदेखील केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांचा समावेश होता. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, सर्व सेवादल स्वयंसेवक व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
..................
रिंग रूटवर परिवहन बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी
कल्याण (वार्ताहर) : दुर्गाडी-बिर्ला कॉलेज रोडदरम्यान चालणाऱ्या रिंग रूट परिवहन बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाहून दुर्गाडी बिर्ला कॉलेज रोडदरम्यान चालणाऱ्या परिवहन बससेवेच्या फेऱ्या अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, शालेय विद्यार्थी, नोकरदार, वयोवृद्धांना दररोज प्रवास करताना अडचण होते. सध्या दररोज सुरू असलेल्या फेऱ्या अनियमित सुरू असून, त्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत. परिणामी लोकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते, जे अनेकांसाठी खर्चिक आणि असुविधाजनक आहे. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी या मार्गावरील बसफेऱ्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टळेल, अशी मागणी भाजपच्या वतीने वरुण पाटील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.