शेतकऱ्यांना श्रावणसरींची प्रतीक्षा
विक्रमगड/वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : श्रावण सुरू होऊन अनेक दिवस होऊनही पावसाच्या सरींनी पाठच फिरविलेली आहे. शेती पिकालाही हानी पोहचण्यास सुरुवात झाली आहे. जे काही शेतात पावसाचे पाणी टिकून होते ते आटून चालल्याचे दिसून येत आहे. यामुळे लावलेले भातरोपे सुकू लागल्याने शेतकरी श्रावण सरींच्या प्रतीक्षेत आहेत.
अलिकडे रानावनात लहान-मोठे रंगीबेरंगी पक्षी व बगळे एखाद्या झाडावर शांतपणे निपचितपणे बसलेले दिसून येतात. जणू काही ते श्रावणसरींची आतुरतेने वाट पहात बसल्याचे जाणवते. श्रावण मासाच्या निमित्ताने गावागावांमधील मंदिरे सजलेली दिसून येत आहेत. मात्र, दुसरीकडे काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाच ते सहा दिवस पाऊस कमी झाल्याने शेतीपिकालाही हानी पोहचण्यास सुरवात झाली आहे. जे काही शेतात पावसाचे पाणी टिकून होते ते आटून चालले आहे. नुकताच विक्रमगड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात पिकाची लागवड केली असल्याने पावसाने दडी मारल्याने अनेक शेतात पाण्याअभावी भेगा पडायला लागल्या आहेत. तर अनेक ठिकाणी भात रोपे सुकू लागली आहेत. अशीच परिस्थिती चार ते पाच दिवस राहिल्यास भात पिकाची रोपे पाण्याअभावी सुकून जाण्याची शक्यता तालुक्यातील शेतकरी वर्तवत आहेत. श्रावणसरी आधे मध्ये बरसत असल्या तरी हलक्या स्वरूपाच्या आहेत. कधी श्रावणातल्या हलक्या सरी कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशा अनेक समस्या सद्यस्थितीत जाणवत आहेत. समाधानकारक पाऊस होत नसल्याने भात शेती अडचणीत सापडली आहे. पुढील दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास भातशेती भात रोपे पाण्याअभावी सुकून जाण्याची दाट शक्यता आहे.
----------------------------------------
भाज्यांचे दर वधारले
श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा व उपवासाचा असल्याने साहजिकच शाकाहाराला ग्रामीण भागात महत्व देण्यात येते. या महिन्यात विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात पौष्टीक रानभाज्यांची मेजवानी मिळत असली तरी नेहमीच्या बाजारी भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. भेंडी, फ्लाँवर, शेवगा शेंग, शिमला मिरची प्रति किलो १०० ते १२० रु,. दराने विकली जात आहे. ओला मटार, पावटा यांना तर भावच चढलेला आहे. एरव्ही इतर हंगामात वाढीव दराने विकले जाणारे चिकन, मटण श्रावणात मात्र, कमी दराने विकले जात आहे. २६० प्रति किलो दराने असणारे चिकन आता १६० ते २०० रुपयांवर आलेले आहे.
---------------------------------------------
हजारो रुपयांचे भात खरेदी केले
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो, परंतु तोच आज कोलमडून पडला आहे. बहुतांशी शेतकऱ्यांचे भात शेती हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचे भात विकत घेऊन महागडी खते, औषधे खरेदी करून लागवड केली होती. त्यामुळे यंदा अपुऱ्या पाण्याअभावी यंदा भात उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
वाढीव दराने भात लावणी
वसई,भाईंदर, ठाणे शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रात मजुरी चांगली मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजुरांचा ओढा हा शहराकडे आहे.तरुणाईचा ओढा हा शहरातील कंपन्यांकडे असल्याने भात लावण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासत आहे. जर मजूर उपलब्ध झालेच तर वाढीव दराने भात लावणी करण्यासाठी आणावे लागतात. वाढीव दराने भात लावणी करूनही सध्या समाधानकारक पावसाचा पत्ता नाही. अशावेळी खर्च केलेले पैसे निघतील की नाही अशी चर्चा शेतकरी वर्गात सातत्याने होताना दिसत आहे.
----------------
ग्रामीण भागात श्रावण महिन्यात रिमझिम बरसणारा धारा बरसत नसल्या तरी, हिरवाईने विक्रमगड सारख्या ग्रामीण भागाचे सौदंर्य खुळले आहे. श्रावणातल्या श्रावण सरींची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.
- अनिल राघो गोविंद, नागरिक, विक्रमगड
------------------------
पाच ते सहा दिवसा पासून ग्रामीण भागात पाऊस नसल्याने शेतात पावसाचे पाणी टिकून होते ते आटून गेलेले आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती चार ते पाच दिवस राहिल्यास पाण्या अभावी भात रोपे सुकून शेतकऱ्याचे नुकसान होईल.
- सोपान परसु दिघे, शेतकरी, मोहू खुर्द
-----------------
भातशेती पाण्याअभावी कोरडी झाली आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. यंत्रांचे वाढलेले दर, मजुरांचा अभाव, त्यातच निसर्गाचे बदललेले चक्र यामुळे भातशेती धोक्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात गणपतीच्या मुहूर्तावर भातशेती पोटरीवर येण्याची शक्यता आहे. पुढील दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पर्यायी स्त्रोतांकडे वळावे लागेल.
- संजय पाटील, प्रगतशील शेतकरी, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.