मांसाहारावरुन कल्याण डोंबिवलीत वादंग
मांसाहारावरून कल्याण-डोंबिवलीत वादंग
पालिकेच्या निर्णयाला नागरिकांकडूनही विरोध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला कत्तलखाना तसेच चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासंबंधी नोटिसा त्यांनी विक्रेत्यांना दिल्या आहेत. पालिकेत हा निर्णय १९८८ सालापासून लागू असला, तरी आता त्याला सर्वच स्तरांतून विरोध होऊ लागला आहे. याविरोधात राजकीय प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता खाटीक समाजानेदेखील याला विरोध दर्शविला आहे. सर्वसामान्य नागरिकांनीदेखील आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका, असे मत व्यक्त केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने डिसेंबर १९८८ रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सादर केलेल्या निवेदनाचा विचार करीत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या अधिसूचनेनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कल्याण महापालिकेचे प्रशासक शि. ग. भोसले यांच्या पत्रानुसार एप्रिल १९८७मध्ये देण्यात आलेल्या शासनाच्या सल्ल्यानुसार कल्याण महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने (लहान मोठ्या जनावरांचे) गांधी जयंती, महावीर जयंती, सर्वत्सरी, गणेश चतुर्थी, १५ ऑगस्ट, १५ नोव्हेंबर या दिवशी बंद ठेवण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १९८८ सालापासून हा निर्णय लागू असताना यंदा मात्र हा विषय मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याला विरोध केला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीदेखील पालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शविला. यानंतर सर्वच राजकीय स्तरातून याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता सर्वसामान्य नागरिकांनीदेखील याला विरोध दर्शविला असल्याचे दिसून येत आहे.
खाटीक समाजाचे साजिद खान म्हणाले, की केवळ कल्याण डोंबिवली महापालिकेत हा निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर असा कोठेही हा निर्णय नाही. पालिका प्रशासनाकडून त्या दिवशी कारवाई केली जात असल्याने आम्हाला दुकान बंदच ठेवावे लागते. तशा नोटिसा आम्हाला आल्या आहेत; मात्र केवळ आम्हालाच हा निर्णय लागू का, असा आमचा सवाल आहे.
मागील १०-१५ वर्षांपासून महापालिका वर्षातील काही ठरावीक दिवसांसाठी ही सूचना जारी करीत आलेली आहे. इतर महापालिकांविषयी मला माहीत नाही. हा निर्णय नवीन नाही. गेल्या १०-१५ वर्षांपासून तो अमलात आणला जात आहे आणि आम्ही फार वेगळं काही केलेले नाही.
- अभिनव गोयल, केडीएमसी आयुक्त
मटण, चिकन विक्रेत्यांवर बंदी आणली जाते. डीमार्ट, रिलायन्स यांसारखी मोठी दुकाने, मॉल येथे होणारी विक्री त्याला बंधन का नाही? हॉटेल्स, चायनीज गाड्या, हातगाड्यांवर होणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला बंदी का नाही? शासनाने हा निर्णय घेताना सर्व लोकांचा विचार करायला हवा होता. हा निर्णय म्हणजे आमच्यावर हुकूमशाही लादली जात आहे, असा आहे.
- शंकर जाधव, नागरिक, डोंबिवली.
मांसाहारी हॉटेल्स, केएफसीसारखी उपाहारगृहे बंद ठेवणार का?
कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ ऑगस्ट रोजी चिकन आणि मटणविक्रीवर बंदी घातल्याने नवा वाद सुरू झाला आहे. या निर्णयावर मनसे नेते राजू पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राजू पाटील यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करीत प्रशासनाला सवाल केला आहे, ‘‘जर चिकन आणि मटणविक्री बंद ठेवायची असेल, तर मग केएफसी, मॅकडोनाल्ड्ससारखी मांसाहारी उपहारगृहेही बंद ठेवणार का?’’ ते म्हणाले की १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस आणि श्रीकृष्ण जयंती असल्याने अनेक लोक स्वेच्छेने शाकाहार करतात. त्यामुळे प्रशासनाने असा ‘फतवा’ काढण्याची गरज नाही. पाटील यांनी प्रत्येकाला खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगत आयुक्तांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी चांगल्या दिवशी संघर्ष टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांनाही हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.