कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्यांना करसवलत

कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्यांना करसवलत

Published on

कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्यांना करसवलत
त्रयस्थ संस्थेमार्फत वाहतुकीस बंदी; अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या निवासी, व्यावसायिक संकुलांतील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थेमार्फत वाहतूक करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. संबंधित आस्थापनांनी कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे किंवा संबंधित कचरा पालिकेकडे सोपवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. दरम्यान, जागेवरच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांना मालमत्ता करातून सवलतदेखील देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.  
निवासी, व्यावसायिक संकुलांत निर्माण होणाऱ्या कचऱ्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) विनायक भट, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, सहाय्यक अभियंता उपस्थित होते.  कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि तो इतरत्र कुठेही टाकला जाऊ नये, यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.  प्रत्येक विभागातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकांनी १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान सर्वेक्षण करून दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या किंवा पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या आस्थापनांची नावे, त्यांच्याकडे कचऱ्यावर प्रक्रिया होते किंवा नाही, होत असल्यास कोणत्या संस्थेमार्फत ती केले जाते, त्यासाठी किती शुल्क आकारले जाते अशा बाबींचा आढावा घेण्याचे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले आहेत. 
---
पिवळ्या कचरापेट्यांचे वितरण
‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे संकलन’ सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था इत्यादी आस्थापनांना कचरा संकलनासाठी तयार केलेल्या ‘पिवळ्या कचरापेटी’चे वितरण सोमवारपासून (ता. १८) करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 
--
वैद्यकीय कचऱ्याची नोंदणी करा
 ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यात प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेला विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेज, कालबाह्य औषधी आणि श्रृंगार केंद्रामध्ये  निर्माण होणारा कचरा इत्यादींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला, तरी अनेकदा तो सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्याबाबतची नोंदणी पालिकेकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापना - २,६०९
कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या आस्थापना - ७८४
त्रयस्थ संस्थांना कचरा देणाऱ्या आस्थापना - ७२७
पालिकेकडे कचरा देणाऱ्या आस्थापना - १,०९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com