उघडे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी धोक्याचे

उघडे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी धोक्याचे

Published on

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : पावसाळ्यात शहरातील रस्ते, मोहल्ले, मुख्य बाजारपेठ आणि चौकांमध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या आता गंभीर आजाराचे कारण बनत आहेत. संध्याकाळी या गाड्यांवर मोठ्या संख्येने लोक जमतात. परंतु उघड्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची आणि तेथील स्वच्छतेची पातळी अत्यंत चिंताजनक आहे.
शहरातील ठिकठिकाणी हातगाडी आणि उघड्यावर घाणेरडे आणि निकृष्ट घटक वापरून पदार्थ बनविताना दिसून येत आहे. मोमोज, चाउमीन, बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी, चाट, फालुदा आदी वस्तू रस्त्यावर विक्री होत असतात. कबाबसारख्या गोष्टी बऱ्याचदा घाणेरड्या हातांनी बनवल्या जातात. बहुतेक दुकानदार स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. माशांचा प्रादुर्भाव वाढत आहे. निकृष्ट दर्जाचे तेल वापरले जाते. पदार्थ बनवताना स्वच्छता आणि मानकांचे पालन केले जात नाही. सध्या लहान मुले आणि तरुणांना फास्ट फूड पदार्थांची सवय लागली आहे. ज्यामुळे नकळत आरोग्य धोक्यात येत आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अन्न सुरक्षा जागरूकता मोहिमा राबविल्या पाहिजेत. मुलांना आणि नागरिकांना स्वच्छ, घरी शिजवलेले अन्न खाण्यास प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. अस्वच्छ पदार्थ विक्री करणाऱ्यांवर महापालिका आणि अन्न विभागाची संयुक्त कारवाई, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड, तसेच परवाने रद्द करणे, अशा कारवाई होणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तातडीने कठोर पावले उचलली नाही, तर या गाड्या शहरात आजारांचे कारण बनत राहतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

दुकानदारांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता हवी
चायनीज आणि इतर फास्ट फूडमध्ये वापरले जाणारे रसायने आणि चटण्या अत्यंत हानिकारक आहेत. पोटाचे संसर्ग, यकृत, मूत्रपिंडाच्या समस्या, कावीळ, मूळव्याध आणि अनावश्यक लठ्ठपणा यांसारखे आजार निर्माण करतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या फास्ट फूड स्टॉलवर कडक देखरेख आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये आणि तरुण मुलांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. तसेच, अन्न विभागाने नियमित छापे टाकून या दुकानदारांना स्वच्छतेबाबत जागरूक करावे, असे डॉ. सैफिक सिद्दीकी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com