कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

कल्याणमध्ये चरी भरण्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप
कल्याण (वार्ताहर) : महापालिकेने कल्याण पश्चिम भागातील रस्त्यांवर चरी भरण्याचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे काम ‘यशराज एंटरप्राइजेस’ या कंपनीला दिले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे असून पावसाच्या सुरुवातीला चरी वाहून गेली, अशी माहिती समोर आली आहे. या कामावर माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, "ज्या रस्त्यांवर काम केल्याचे ठेकेदार सांगतो, ते रस्ते आधीच काँक्रिटचे आहेत. मग चरी कुठे भरली?" असा सवाल त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना केला आहे. यासंदर्भात उगले यांनी आयुक्तांना लेखी पत्र देखील दिले आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.
............................
कर्करोगविषयी जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कल्याण (वार्ताहर) : भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालय, कल्याण पश्चिम येथे कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीमधील सुमारे १५० विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले. कार्यक्रमामध्ये पल्स हॉस्पिटल येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ऋतू पराग मिसर, तसेच इन्नर व्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्स च्या अध्यक्षा डॉ. तृप्ती बोबडे, डॉ. विसपुते, आणि पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सीएमडी बिपीन पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, वजनात होणारे अचानक बदल, तंबाखू व सिगारेटसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम, आणि प्रत्येकाने आरोग्य तपासणी नियमितपणे का करावी, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि पालकांमध्ये सुदृढ जीवनशैलीचा संदेश पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
.................
मिलिंद एकबोटेंविरोधात कल्याणमध्ये निदर्शने
कल्याण (बातमीदार) : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर मिलिंद एकबोटे यांनी केलेल्या टीकेचा कल्याणमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका सभेत अजित पवार यांच्या विधानावर टीका केली होती. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कल्याण पूर्वेतील काटेमानवली नाका येथे मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांचे नेतृत्व कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांनी केले, तर मार्गदर्शन माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस मनोज नायर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कडू, जिल्हा सचिव देवबा सूर्यवंशी, प्रदेश प्रतिनिधी वर्षा कळके, भावेश सोनवणे, महिला व विद्यार्थी कार्यकर्ते आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सर्वांनी मिलिंद एकबोटेंच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा जाहीर निषेध केला.
...................
वीर स्मारक स्वच्छता अभियान
डोंबिवली (बातमीदार) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत, भाजपा डोंबिवली पूर्व मंडळातर्फे वीर स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा उपक्रम भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच कल्याण जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि मितेश पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. डोंबिवली पूर्वेतील लोकमान्य टिळक स्मारक येथे मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतला, तसेच स्वातंत्र्य संग्रामातील अमर वीरांना अभिवादन केले. कार्यक्रमात डोंबिवली पूर्व मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
.............................
वैशाली परदेशी यांचा अर्धांगिनी पुरस्काराने सन्मान
डोंबिवली (बातमीदार) : छत्रपती शिवाजी नाट्यगृह, दादर येथे अर्धांगिनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात वैशाली परदेशी यांचा कार्यकर्तृत्वाबद्दल सन्मान करण्यात आला. वैशाली संदेश परदेशी यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पणामुळे समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com