खड्डे भरण्यावरून ‘श्रेयवाद’

खड्डे भरण्यावरून ‘श्रेयवाद’

Published on

उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : महापालिकेच्या खड्डेभरणी मोहिमेवरून सत्ताधारी भाजपवर आणि टीम ओमी कलानी यांच्यावर टीका होत आहे. ‘कोणामुळे काम सुरू झाले?’ या श्रेयाच्या वादावरून समाज माध्यमांवर चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. एका बाजूला प्रशासनाचे खड्डे भरतानाचे जीपीएस पुरावे, तर दुसऱ्या बाजूला टीम ओमी कलानी यांची ‘शर्म करो - खड्डे भरो’ मोहीम आणि भाजप आमदारांचा आंदोलनाचा इशारा या सर्व घटनांमुळे शहरासाठी काम महत्त्वाचे की श्रेयाची धडपड? हा प्रश्न उभा राहिला आहे.
उल्हासनगर महापालिकेने आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दिनेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २ ऑगस्टला शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यास सुरुवात केली. यासाठी १४ जुलैपासूनच शहरातील खड्डे बुजविण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. आयुक्तांकडून लेखी आदेशही १४ जुलैला दिले होते. कायदेशीर निविदा प्रक्रिया आणि पावसामुळे येणारे अडथळे यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर २ ऑगस्टपासून अत्याधुनिक मास्टिक डांबरचा वापर करून प्रभागनिहाय खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या कामावरून आता शहरात ‘श्रेयवाद’ निर्माण झाला आहे.

ओमी कलानी यांनी ‘शर्म करो-खड्डे भरो’ ही मोहीम सुरू करत आमदार कुमार आयलानी यांना लक्ष केले होते. त्यानंतर ११ ऑगस्टला आमदार आयलानी यांनी समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसिद्ध करत ‘सात दिवसांत खड्डे न भरल्यास पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल’, असा इशारा दिला होता. या विधानानंतर नागरिकांच्या चर्चेला उधाण आले. सत्तेत असलेल्या आमदारालाच आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १२) उल्हासनगर महापालिकेने शहरातील खड्डे भरण्याच्या कामाचे जीपीएस ट्रॅकिंगसह फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. हे फोटो स्पष्टपणे दाखवत होते की, २ ऑगस्टपासूनच खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. यामुळे ओमी कलानी यांची मोहीम आणि आमदार आयलानी यांच्या दाव्याची विश्वासार्हता डळमळली. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनीही हेच फोटो शेअर करत दावा केला की, ‘आमदारांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हालचाल केली’. मात्र, महापालिकेच्या जीपीएस फोटोमधून ही बाब खोटी ठरली आणि त्यामुळे सामान्य नागरिकांनी राजकीय नेत्यांना चांगलेच धारेवर धरले.

राजकीय नाटकावर ताशेरे
उल्हासनगर महापालिकेने एकीकडे कामाचे फोटो देऊन पारदर्शकता दाखवली, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. त्यामुळे ‘श्रेय’ घेण्याच्या नादात विसंवाद उफाळून आला. नागरिकांनी या राजकीय नाटकावर समाजमाध्यमांवर ताशेरे ओढले. या सगळ्या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये ‘खड्डे’ हा मुख्य मुद्दा राहिला नाही, तर ‘श्रेय कोणाचे?’ या प्रश्नानेच चर्चेचे केंद्रस्थान घेतले. ‘जर खड्डे भरण्याचे काम सुरू होते, तर इशारा देण्याची गरज काय होती? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. खड्डे भरले गेले की नाही यापेक्षा ‘कोणामुळे’ भरले यावरून सुरू झालेली ही ‘श्रेयवाद’ उल्हासनगरच्या राजकारणातील विसंवाद उघड करत आहे.

आरोप-प्रत्यारोपाचा भडका
सार्वजनिक सुविधांपेक्षा ‘श्रेय’ मिळवण्याची धडपड अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे उल्हासनगरात पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या खड्डेभरणी मोहिमेवरून उल्हासनगरात टीम ओमी कलानी आणि सत्ताधारी भाजपामधील नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. समाज माध्यमांवर उडालेला आरोप-प्रत्यारोपाचा भडका पाहता, रस्त्यांवरचे खड्डे जितके खोल, तितकीच ही ‘श्रेयवाद’ खोलवर गेलेली दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com