आमा संघटनेविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार
अंबरनाथ ता. १३ (वार्ताहर) : अंबरनाथ एमआयडीसीतील दलालगिरी, भूखंडांच्या अवाजवी विक्रीदरांबाबत आणि स्थानिकांकडून उद्योजकांना त्रास दिल्याच्या आरोपांवरून भूमिपुत्रांनी आमा संघटनेविरोधात एल्गार पुकारला. संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात बुधवारी (ता. १३) आनंदनगर एमआयडीसीतील हॉटेल सुदामापासून निषेध पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप आमा कार्यालयासमोर करण्यात आला. आंदोलनात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते.
अंबरनाथ एमआयडीसीत दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. आमा संघटनेने एमआयडीसीत भूखंड मूळ किमतीपेक्षा चार-पाच पट जास्त दराने विकले जात असल्याचा, भूसंपादन न करताच जागा उद्योजकांना विकल्यामुळे स्थानिक व उद्योजकांत वाद होऊन उद्योग सुरू होण्यास तीन-चार वर्षे लागत असल्याचा आरोप केला होता. याशिवाय, ही परिस्थिती कायम राहिल्यास एमआयडीसीतील एक हजार ४०० कंपन्या राज्याबाहेर जाण्याचा धोका असल्याचे तायडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या वक्तव्यामुळे संतप्त भूमिपुत्रांनी तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करून आमा संघटनेवर कायमस्वरूपी बंदीची मागणी केली. याचसाठी पदयात्रा काढली होती. पदयात्रेदरम्यान तायडे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भूमिपुत्रांची माफी मागितली. आंदोलनावेळी आमदार डॉ. किणीकर, वारींगे महाराज, नरेश गायकर, अविनाश पवार, उमेश पवार, आमा सदस्य, भूमिपुत्र तसेच पोलिस सहआयुक्त शैलेश काळे व शिवाजीनगरचे वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील उपस्थित होते.
एमआयडीसीत ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या आश्वासनावर जमिनी विकल्या गेल्या; मात्र प्रत्यक्षात परप्रांतीयांची भरती केली जात आहे. हा खूप मोठा अन्याय आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी गुन्हेगारीऐवजी उद्योजकतेकडे वळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र तायडे यांचे बेताल वक्तव्य निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला होता.
- वारींगे महाराज, भूमिपुत्र
उमेश तायडे यांना भूमिपुत्रांची प्रगती पाहवत नाही. त्यांच्या संस्थेने प्रकल्पबाधित भूमिपुत्रांसाठी कोणत्याही कल्याणकारी उपाययोजना राबवली नाही. ध्येयधोरणही नाही. एमआयडीसीतील कारखानदारांमध्ये स्थानिकांबद्दल गुंड प्रवृत्ती व दहशतवादी प्रतिमा तयार करून रोजगारापासून व्यवसायापासून स्थानिकांना वंचित करण्याचा जणू विडाच उचलला आहे. तायडे यांनी कारखानदारांमध्ये पसरवलेल्या चुकीच्या गैरसमजामुळे महाराष्ट्रातील स्थानिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- नरेश गायकर, भूमिपुत्र
अंबरनाथ : आमा संघटनेविरोधात भूमिपुत्रांनी पदयात्रा काढली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.