स्वातंत्र्यदिनी गडकरी रंगायतनचा पडदा उघडणार
स्वातंत्र्यदिनी गडकरी रंगायतनचा पडदा उघडणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाण्याचा सांस्कृतिक मानबिंदू मानल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणार आहे. हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी वनमंत्री गणेश नाईक, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे, आमदार ॲड. निरंजन डावखरे यांसह अनेक मान्यवरही उपस्थित असणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने लोकसंगीतावर आधारित ‘फोकलोक’ हा युवा कलाकारांचा खास कार्यक्रम रंगणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना या रंगायतनच्या नूतनीकरणासाठी ३१ कोटी रुपये मंजूर केले होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीचा वापर करून रंगायतनच्या जुन्या इमारतीला मजबुती देण्यात आली आहे आणि संपूर्ण यंत्रणा नूतनीकृत करण्यात आली आहे. १९७८ मध्ये बांधलेल्या या रंगायतनची १९९८ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती झाली होती. २६ वर्षांनी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले असून, ऑक्टोबर २०२४ मध्ये काम सुरू झाले होते. कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवरील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण रंगमंचाचे रूपांतर करण्यात आले आहे. यात नवीन फ्लोअरिंग, खुर्च्या, फॉल सिलिंग, अकॉस्टिक पॅनेल्स, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट, वातानुकूलन, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, वायरिंग, ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर यांचा समावेश आहे.
नांदी आणि फ्लूजन कार्यक्रम
लोकार्पणानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे आणि इतर युवा कलाकार नांदी सादर करतील. त्यांना तबला, ऑर्गन यांसारख्या वाद्यांवर साथ दिली जाईल. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध ठाण्यातील कलाकार ‘फ्लूजन’ हा संगीतप्रदर्शन कार्यक्रम सादर करतील.
कार्यक्रमाची प्रवेशिका
रंगायतनच्या उद्घाटनानंतर ‘फोकलोक’ हा लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा कार्यक्रम रंगणार आहे. हा कार्यक्रम रसिकांना विनामूल्य पाहता येईल. प्रवेशिका गुरुवारी (ता. १४ ) दुपारी १२ वाजता रंगायतनच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध होतील. प्रवेशिका प्रथम येणाऱ्यांना प्राधान्याने दिल्या जातील. एक व्यक्ती दोन प्रवेशिका घेऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.